राशीन येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ; कारवाईची मागणी

5

कर्जत, दि. २६ मे.२०२० : कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये कोरोनाचा शिरकाव होण्यास प्रशासनाचा ढिसाळ कारभार जबाबदार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी व येथील भक्त निवास क्वारंटाइन केलेल्या लोकांसाठी उपयोगात आणावे,अशी मागणीराशीन येथील नागरिकांनी केली आहे. याबाबत कर्जतच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील पहिला पॉझिटिव्ह रुग्ण राशीन येथे आढळून आल्यानंतर राशीन मधील नागरिकांनी प्रशासनाचा हलगर्जीपणा सर्वसमोर आणला आहे. यामध्ये असेही म्हटले आहे की, गावाच्या बाहेर असलेले जगदंबा भक्त निवासचा वापर संकटकाळी जनतेसाठी उपयोगात आणता येऊ शकतो. भक्त निवासमध्ये पाण्यासह सर्व सुविधा असून स्वतंत्र महिला व पुरुष प्रसाधनगृह अशा सुविधा उपलब्ध असतानाही राशीन येथील ग्राम पंचायत व वैद्यकीय विभागने क्वारंटाईन करण्यासाठी राशीन येथे जि.प. शाळेमध्ये लोकांना क्वारंटाईन केले आहे.

या शाळेमध्ये कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत व प्रशासनानेही सुविधा पुरविलेल्या नाहीत. त्याठिकाणी महिला पुरुष असतात त्यांना तेथे शौचालयाची कोणतीही सुविधा नाही. क्वारंटाईन केलेले लोक बिनधास्त बाहेर फिरतात. जेवण हि त्यांचे नातेवाईक घेऊन येतात व स्वतः क्वारंटाईन केलेल्या लोकांना देतात. हे लोक अंघोळ करण्यासाठी घरी जातात व परत येऊन बसतात. येथे मनमानी कारभार चालू आहे. अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन लोकांकडून पैसे घेऊन त्यांना घरी सोडतात. कि काय अशी शंका येथील ग्रामस्थांच्या मनात येत आहे. त्यामुळे गावातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाचा हलगर्जीपणा जनतेला दिसून येत आहे.

त्यामुळे राशीनकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या व विलगीकरण कक्ष येथून लोकांना बाहेर सोडणाऱ्या वैद्यकीय अधिकारी प्रशासकीय कर्मचारी तसेच सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांचेवर कामात हलगर्जीपणा करणे व समस्त ग्रामस्थांच्या जीविताशी खेळल्याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी समस्त राशीनकरांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

वेळीच या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास येणाऱ्या काळात अधिक प्रमाणात येणाऱ्या कोरोना महामारीपासून समस्त राशीनकरांना कोणीही वाचवू शकणार नाही.असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर विक्रमसिंह राजेभोसले, ऍड युवराज राजेभोसले, जनाबाई सायकर, राम कानगुडे, अशोक जंजिरे, बापू उकिरडे, अण्णा मोढळे, राजू मुंडे, विजय चुंबळकर, ज्ञानेश्वर चांगुणे, संतोष आपरे, रज्जाक मुंडे, पवन साळवे, वनिता गुजर, शहाबाज शेख आदींसह अनेकांच्या सह्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा