वास्तुशास्त्र सल्लागाराचा खून, १७ दिवसानंतर मृतदेह सापडला निरा नदीत

पुणे, ६ नोव्हेंबर २०२२: बिबवेवाडीतील वास्तूशास्त्र सल्लागाराचं अपहरण करुन त्याचा खून झाल्या नंतर निरा नदीत शोध मोहीम राबवण्यात आली होती. अखेर सतरा दिवसानंतर मृतदेह शोधून काढण्यात यश आलंय. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

खून करुन आरोपीनी मृतदेह निरा नदीत फेकून दिला होता. निलेश वरघडे वय ४३ राहणार सुपर इंदिरानगर बिबवेवाडी असं खून झालेल्या वास्तूशास्त्र सल्लागाराचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरघडे यांचा मित्र दीपक जयकुमार नरळे, राहणार आंबेगाव व त्याचा साथीदार रणजीत जगदाळे यांना अटक केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, हे आरोपी निलेश यांच्या परिचयाचे होते. दोघांनी निलेश यांना कॉफी मधून गुंगीचं औषध दिलं, बेशुद्ध पडल्यानंतर निलेश यांचा गळा दाबून खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात भरुन निरा नदीत फेकून आरोपी पसार झाले होते. सीसीटिव्हीच्या फुटेज वरुन पोलिसांनी दोघांना अटक केली होती.

पोलिसांनी महाबळेव्श्रेर ट्रेकर्स, भोईराज आपत्ती संघ, महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संघाच्या मदतीनं अखेर सतराव्या दिवशी निलेश वरघडे यांचा मृतदेह शोधून काढला. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केलीय.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर