तुम्ही मर्द आहात ना ? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका; अमृता फडणवीसांचा घणाघात

4
मुंबई, 2 नोव्हेंबर 2021: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काल सकाळी एक ट्विट करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  यापूर्वी नवाब मलिक यांनी भाजपा आणि ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्यांचे संबंध असल्याचा आरोप करत थेट विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला होता.
या नंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. ट्विट केलेल्या फोटोतील ही व्यक्ती जयदीप राणा असल्याचं सांगत त्याच्यावर गंभीर आरोप केले. तसेच फडणवीस आणि राणा यांचा ड्रग्ज व्यवसायाशी संबंध असल्याचा आरोप करत हल्लाबोल केला. यावर आता अमृता फडणवीस यांनी माध्यामांशी बोलाताना संतप्त प्रतिक्रिया दिली. तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा. मला मध्ये आणू नका, असा घणाघाती हल्ला अमृता फडणवीस यांनी  नवाब मलिक यांच्यावर नाव न घेता केला.
अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्ला चढवला. राजकीय आरोप-प्रत्यारोपात स्त्रियांनाही ओढले जात आहे. त्यावर तुमचं काय मत आहे? असा सवाल अमृता फडणवीस यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी हे टीकास्त्र सोडलं. ज्या स्त्रिया सरळ मार्गाने जात आहेत त्यांना डिवचू नका, असं मी दोन दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. देवेंद्रजींना टार्गेट करायला तेच आज माझ्याबाबतीत केलं गेलं. तुम्ही मर्द आहात ना? डायरेक्ट त्यांना टार्गेट करा. मला मध्ये नका आणू. एक समाज सेविका म्हणून मी माझे विचार प्रकट करत असते आणि करत राहील. मला कोणीही थांबवू शकत नाही, असं अमृता म्हणाल्या.
बेनकाब तो नवाब भी होता है
देवेंद्र फडणवीस ड्रग्ज पेडलरच्या पाठीशी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी त्यांच्या जावयाला विचारावं कोण कुणाच्या पाठिशी आहे. बेनकाब नवाब भी होता है और वो जरुर होगा. फक्त वेळ यावी लागते, असं सूचक विधान त्यांनी केलं. मी ट्विट केलं. काही लोकांना काहीच सूचत नाही, त्याबद्दल मी ट्विट केलं आहे. जेव्हा एखाद्या माणसात निगेटिव्हीटी आलेली असती तेव्हा तो खराबच विचार करतो. बाकी काही नाही, असा चिमटाही त्यांनी काढलाय.
राणाचं नाव काढलं तर चुकीचं काय?
जयदीप राणाचं नाव गाण्यातून वगळण्यात आलं आहे, याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांना माहीत नसेल तो ड्रग्जमध्ये आहे म्हणून. रिव्हर मार्चलाही माहीत नसेल. म्हणून त्याचं नाव कट केलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे?, असा सवालही त्यांनी केला. मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे ते काय एक्सपोज करणार? आमच्याकडे जमीनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा