तु व्हर्जिन आहेस का?…..कौमार्य चाचणी आजही होते…..

तू व्हर्जिन आहेस का? हा प्रश्न नेहमीच मित्रांच्या ग्रुपमध्ये अथवा व्यक्तीगत विचारला जातो. म्हणजे कॉलेज पासून ते ऑफिसच्या कॅन्टिन पर्यंत, जर आपल्यातील कुठली व्यक्ती ही लग्न झालेली नसेल तर तिला हा प्रश्न हमखास विचारला जातो. “तू व्हर्जिन आहे का?”आणि जर एखादी व्यक्ति व्हर्जिन असेल तर मग तिची तेर खेचणे किंवा तिला डिवचणे चालू होते, हे सगळं आपल्या आजूबाजूला सुरू असतं! त्यातून निर्माण होणारे वाद, कलह, अबोला तसेच न्यूनगंड ही देखील आपल्याला ठाऊक असतात.

तसा व्हर्जिन हा शब्द आता काही नवीन नाही किंवा त्यात आश्चर्य वाटण्यासारखं देखील काहीच नाही. कारण, आता काळ बदलला आहे, न समजून घेण्याची पद्धत वाढीस लागली आहे. वाढीस लागली आहे कि तशीच……? व्हर्जिनीटी, सेक्स, प्रेफरन्स अशा सगळ्या गोष्टींना एकेकाळी टॅबू मानले जात होते. आता या विषयावर अगदी खुलेपणे भाष्य केले जाते आणि ते झाले पाहिजेही. आज भारताला स्वतंत्र्य मिळून ७२ वर्ष पुर्ण झाली. काळानुसार वेळ ही बदलत गेली. पण, याबाबतीत अनेक गोष्टी,दृष्टिकोन मात्र तसेच राहीले.

व्हर्जिन म्हणजे पवित्र असे ते म्हणाले जाते. एखाद्या व्यक्तीनं सेक्स केला नसेल आश्यांना व्हर्जिन म्हटले जाते. वर्जिन शब्दाचा संबंध हा एखादी तरुण मुलगी ही धार्मिक मान्यतांनुसार पात्र आहे की नाही या अर्थाने देखील घेतला जातो. म्हणजे जर कुठल्या मुलीला चर्चमध्ये यायचं आहे, तर यासाठीच्या तिच्या पवित्रतेला वर्जिनीटी म्हटले जाते. यावर एक गोष्ट देखील प्रचलित आहे.

ही गोष्ट चौथ्या-पाचव्या शतकातील असेल. तेव्हा एक राजकन्या होती अरसुला नावाची. जीला आज घडीला संत अरसुला म्हणून ओळखले जाते. अरसुला हिचे पिता ब्रिटनच्या एका भागाचे राजा होते. अरसुला हिने पित्याच्या म्हणण्यानुसार लग्न केले आणि आपल्या पतीला भेटण्याकरिता ११ हजार वर्जिन हेल्पर्स सोबत जहाजाने त्याच्या दिशेनं निघाली.

प्रवासादरम्यान अचानक वादळ आले. तरी अरसुलानं निश्चय केला की, मी आधी पोपला भेटून नंतर आपल्या पतीला भेटायला जाईन. पण, त्यांना वाटेत हंस मिळाले. हंस म्हणजे तो पक्षी हंस नाही. वेस्टर्न युरोपमध्ये राहणारा घुमंतू समूह. ह्या हंस लोकांनी अरसुला सोबतच त्या ११ हजार व्हर्जिन सेविकांची हत्या केली. त्यामुळंच क्रिस्टोफर कोलंबसने अमेरिकेच्या तिथल्या आयलंडचं नाव व्हर्जिन आयलंड असं ठेवलं.

आजच्या काळात व्हर्जिन नसणं म्हणजेच आयुष्याची मजा घेणं ही जी व्याख्या बनली आहे ती पुर्णपणे चुकीची आहे, कारण व्हर्जिन राहणं किंवा न राहणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.

व्हर्जिनीटी किंवा कौमार्य गमावणे ही खूप सामान्य आणि क्षुल्लक गोष्ट मानली जाते,फार पूर्वी या गोष्टीला खूप महत्व होते. ते काळजी पोटी कि अंधश्रद्धेपोटी हेच कळत नाही. आजही कित्येक गावात स्त्रीयांच्या कौमार्य चाचण्या केल्या जातात. पण, बऱ्याचशा शहरी भागात गोष्ट सामान्य झाली आहे आणि याच नजरेतून बघितले जाते.

काय असते कौमार्य आणि कौमार्य चाचणी……

लग्नाच्या पहिल्या रात्री केली जाणारी योनिशुचिता म्हणजेच कौमार्य चाचणी! लग्न झालं की त्या रात्री नवरा नवी पांढरीशुभ्र चादर घेऊन नवी नवरी असलेल्या खोलीत जातो आणि बिछान्यावर ही चादर पसरवली जाते. शरीरसंबंध झाला की त्या चादरीवर रक्ताचा डाग पडणं सक्तीचं असतं. (ते झालं नाही की ती नवी नवरी ‘खोटी’.) जे काही असेल ते घेऊन तो नवरा मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी खोलीच्या बाहेर येतो. पंच मंडळी निवाड्याला बसलेलीच असतात. ते विचारतात, ‘रात्री जो माल तुला दिला होता,तो कसा? खरा की खोटा?’ इतक्या गलिच्छ भाषेत त्या नव्या नवरीचा अपमान केला जातोय आणि तोही आजच्या एकविसाव्या शतकात!

भाट सामाजात अजून ही हि प्रथा चालू आहे. या बद्दलच चळवळ करून समाजप्रबोधनाचं काम करणा-या प्रियंकाताई तमाईचेकर यांनी एका माध्यमांवर स्पष्टपणे भाष्य केलं जे आमच्या दृष्टीस पडलं आणि महत्वपूर्ण देखील आहे. ज्यामधील माहिती आम्ही इथं देत आहोत. कौमार्य चाचणी करण्या-या वर्गाला त्या काही प्रश्न विचारतात.

मुळात ही कौमार्याची परीक्षा कशासाठी? मुलींनी व्यभिचार करू नये म्हणून. का? प्रत्येक मुलगी वयात आली म्हणजे व्यभिचार करणार असेच यांना वाटते का? व्यभिचार म्हणजे काय याचा नेमका अर्थ तरी या लोकांना माहीत आहे का? मला संत कबीरांचा एक दोहा आठवतो, ‘नहाये धोये क्या हुआ, जो मन मल न जाए, मीन सदा जल में रहे, धोये बास न जाए’ ज्यांच्या मनातच घाण आहे त्यांनी किती जरी जल स्नान केलं तरी मनाची शुद्धी होणार नाही, जसा मासा पाण्यातच राहतो पण बाहेर काढला तरी त्याचा वास जाता जात नाही. म्हणूनच या घाणेरड्या प्रथा बंद होणं जरुरी आहे, अशा प्रथा ज्या कोणाचंही भलं करत नाही. याचमुळं कंजारभाट समाज आज मागे पडला आहे. याचं आम्हाला दु:ख होतंय. त्याच्या विरोधातच आम्हाला हा लढा लढायचा आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या समाजातील उच्चशिक्षित आणि अशिक्षित दोघांनाही ही कौमार्य चाचणी बंद व्हायला नको आहे. कारण त्यांच्या मते ही चाचणी महत्त्वाची आहे. ती जर नाहीशी झाली तर समाजातील मुली बिघडतील आणि मर्यादेत राहणार नाहीत. अशा विचारसरणीच्या लोकांना मला काही प्रश्न विचारावेसे वाटतात की कौमार्य चाचणी ही फक्त भाट समाजात आहे म्हणून काय फक्त भाट समाजाच्या मुलींचेच चारित्र्य स्वच्छ आहे आणि देशभरात ही प्रथा कुठल्याच समाजात नसल्यामुळे देशातल्या मुली चारित्र्यहीन आहेत का?  सगळ्याच मर्यादेच्या बाहेर आहेत का? आणि या प्रथेमुळं भाट समाजात असणाऱ्या सगळ्याच मुलींचे कौमार्य सुरक्षित राहील का? विज्ञान हा विषय किंवा वैज्ञानिक कारणे भाट समाजातल्या मुलींना लागू होत नाहीत का? मुळात ही जी पद्धत आहे ती विज्ञानाच्या निकषावर रास्त आहे का कारण यौन पडदा फाटण्यासाठी मुलीचं खेळणं, अपघातही कारणीभूत असू शकतात, हे या लोकांना कधी कळेल? का मुलींच्या सन्मानाचा आणि अभिमानाचा बाजार या समाजात मांडला जातो? शिवाय मुलांच्या कौमार्य परीक्षेसाठी निकष काय? मुलाचं कौमार्य टिकलेलं आहे का, हा प्रश्न त्यांना कोण विचारणार? म्हणजे अगदी सती प्रथेपासून ते २०१८ मध्ये चालू असलेल्या कौमार्य चाचणीपर्यंत फक्त मुलींवरच अन्याय का? तुम्ही नक्की या स्वतंत्र भारताचे नागरिक आहात का? याची मला शंकाच वाटते.

तसेच या बद्दल त्यांनी दोन घटनेंचा उल्लेख करून प्रकर्षाने डोळ्यासमोरील झापडं उघडण्याचे काम केले आहे.

कौमार्य चाचणीबरोबरच बालविवाह, शुद्धीकरण आणि इतरही अन्याय प्रथा भाट समाजात आहेत आणि त्याचा न्यायनिवाडा केला जातो जातपंचायतीमार्फत. कुणी अधिकार दिले त्यांना? भाट समाजातली ही कुठल्याही प्रकारचा आधार नसलेली न्याय व्यवस्था बंद होणं फार गरजेचं आहे. उदाहरणच द्यायचं तर एका स्त्रीच्या शुद्धीकरणाचे देता येईल. आमच्या समाजात कोणत्या अन्याय पद्धती आहेत त्याचं हे प्रातिनिधिक उदाहरण. नाशिक जिल्ह्यातील संगमनेर गावातल्या एका स्त्रीवरच्या गलिच्छ अन्यायाचं नाव होतं, शुद्धीकरण! तिच्यावर अनैतिक संबंधाचे आरोप लावून तिचं शुद्धीकरण करावं लागेल, असं फर्मान या बुद्धीला गंज चढलेल्या लोकांनी काढले. जंगलात जाऊन धीज गोळा करणे म्हणजेच रात्रभर तापवलेला लोखंडी गोळा तिच्या ११ वर्षीय मुलाच्या हातात ते देणार आणि ती स्त्री पूर्णत: वस्त्रहीन होऊन तिथे उपस्थित पुरुषांसमोर अर्थात पंचांसमोर १०७ पाऊले चालणार. ती चालत असताना तिच्यावर गव्हाच्या कणकेचे गरम गोळे फेकून मारले जाणार. ती चालत असताना तिच्या त्या ११ वर्षीय निरागस मुलाचे हात भाजून निघाले तर ती स्त्री पापी आणि दोषी हे सिद्ध होणार आणि जर मुलाचे हात भाजले नाहीत तर ती ‘शुद्ध’ असा निकाल जात पंचायत देणार. वा काय न्याय! पण सुदैवानं तिनेच जातपंचायतीचा हा निर्णय फेटाळून लावला आणि पोलिसांकडे धाव घेतली.

दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातील संगमनेरमधल्याच पोलीस भरतीसाठी तयारी करीत असलेल्या मुलीची. गेली कित्येक वर्षे तिच्यावर अन्याय होत आहे. तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री ती कौमार्य परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकली नाही म्हणून तिला मारहाण करण्यात आली. तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यात आला. तिचा नवरा किंवा कुटुंबीय कुणीही हे लक्षात घेतलं नाही की तिचे कौमार्य पटल लग्नापूर्वी फाटण्यामागचं कारण तिची पोलीस भरतीची तयारी होती. आजही तिला प्रचंड मानसिक त्रास दिला जातोय, तिचा साथीदार तिला, ‘‘तू काय मला लाल रंग दाखवला नाहीस.’’ असं उठता बसता बोलून मारहाण करतो, छळ करतो. आजही ती मोकळा श्वास घेऊ शकत नाही. कारण तिचा न्यायनिवाडा करणारं कोणी नाही. जे आहेत त्यांचे हेच विचार आहेत. कुठपर्यंत चालू राहणार हे?

यावरून कळते की आजही काही भागात अश्या विकृतीचे चेहरे कसे दडून बसलेत आणि या अन्याया विरुद्धच आवाज उठविला तो प्रियंका ताईंनी या बद्दल त्यांनी पुढे म्हटलं….

अर्थात आज मी आणि माझ्या बरोबरच्या काही जणांनी पुढाकार घेतला आहे त्यासाठी समाजातल्या लोकांचा आणि काही नातेवाईकांचा प्रचंड विरोध आहे. माझ्या वस्तीमध्ये राहणारे लोक सध्या अशा पद्धतीनं बघतात किंवा वागतात की मी एखादा गुन्हाच केला आहे आणि याची शिक्षा माझ्या भावालाही झालीय. वस्तीत होणाऱ्या क्रीडास्पर्धामध्ये त्याला भाग घेऊ दिला जात नाहीए. थोडक्यात, आमच्या जातपंचायतीने बहिष्कृत करण्याआधी समाजातले लोकच मला आणि माझ्या कुटुंबाला बहिष्कृत केल्यासारखे वागवत आहेत. या गोष्टीचं फार वाईट वाटतं की, ज्या समाजातल्या मुलींच्या स्वाभिमानासाठी मी झगडतीये त्याच समाजाचे लोक मला आणि माझ्या ‘स्टॉप द वि रिच्युअल’ ग्रुपमधल्या प्रत्येकाला ‘समाजद्रोही’, ‘समाजकंटक’ म्हणत आहेत.

आज अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या (अंनिस) पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या प्रथेचा विरोध करत आमच्या साथीला उभ्या आहेत. भाट समाजातील काही युवा ‘स्टॉप द वि रिच्युअल’च्या चळवळीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत तेव्हा त्याही या चळवळीत सहभागी झाल्या.

आम्हाला या कुप्रथेतून बाहेर पडण्यासाठी समाजाची साथ हवी आहे, कारण आमच्याच समाजातली आमची म्हणवणारी माणसं आमच्या विरोधात गेली आहेत. आम्हाला बहिष्कृत करू पाहात आहेत. खाली दिलेल्या फेसबुक पेज लिंकवर क्लिक करून आमच्या चळवळीला तुमचा पाठिंबा जाहीर करा, आम्हाला बळ मिळेल या स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या कुप्रथेच्या विरोधात लढण्याचं!

– प्रियंका तमाईचेकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा