धाराशिव २४ डिसेंबर २०२३ : धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड या बँकेत, सायंकाळी ५:४३ वाजता पाच दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या सोने आणि रोकड लुटून लाखो रुपयांचा दरोडा टाकला आहे. विशेष म्हणजे बँकेत फक्त दोघेजणच असताना त्यांनी दरवाजा देखील बंद केलेला नव्हता. बँकेत प्रवेश करीत मॅनेजरच्या मानेवर पिस्टल ठेवले आणि कॅशियरचे हात बांधून त्याला डांबून लुटालूट करण्यात आली. या दरोड्याचा थरार अगदी सिने स्टाईलप्रमाणे अवघ्या १० मिनिटांच्या आत घडला आहे. मात्र बँक व्यवस्थापक किंवा कॅशियर या दोघांनी देखील आरडाओरड केली नसल्यामुळे ते दरोडेखोर पसार होण्यात यशस्वी झाले.
घटना घडताच बँक कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्याशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर दाखल झाले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात ५ जणांनी सायंकाळी ५:४३ वाजण्याच्या दरम्यान ज्योती क्रांती को-ऑप क्रिडेट सोसायटी लि.धाराशिव या बँकेत प्रवेश केला. यावेळी बँकेत व्यवस्थापक व कॅशियर हेच कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या खांद्यावर पिस्तूल व धारदार चाकू ठेवून ५० तोळे सोने आणि दीड ते दोन लाखांच्या रोख रक्कमेवर दरोडा टाकला असल्याचे समजतय.
अद्याप एकूण किती मुद्देमाल गेला आहे याची माहिती मात्र कळू शकली नाही. बँक लुटणाऱ्या पाच जणांनी तोंडाला चिकटपट्टी लावल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बांगर यांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष दोन पथकांची तात्काळ रवानगी केली आहे. दरम्यान, घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान पथक घटना घडली त्या ठिकाणाहून जुनी स्टेट बँक ऑफ इंडिया या मार्गे नगर परिषदेच्या दिशेने गेले. विशेष म्हणजे शहराच्या मधोमध व लोकांची गर्दी असलेल्या ठिकाणी ही घटना घडली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख