उरी सेक्टरमध्ये लष्कराचं मोठं ऑपरेशन, 3 दहशतवादी ठार, 5 Ak-47, 8 पिस्तुल आणि 70 हँड ग्रेनेड जप्त

उरी, 24 सप्टेंबर 2021: काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबरपासून सुरू झालेली लष्कराची शोध मोहीम संपली. पाच दिवसांच्या या मोठ्या ऑपरेशनमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. लष्करानं तीन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. एवढंच नाही तर शोध मोहिमेत लष्करानं दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रंही जप्त केली आहेत.

भारतीय सैन्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 सप्टेंबरच्या रात्रीपासून हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं. यानंतर, सोमवारी (20 सप्टेंबर) खबरदारी म्हणून उरी सेक्टरमध्ये इंटरनेट देखील बंद करण्यात आलं. मात्र, बुधवारपासून येथे इंटरनेट पूर्ववत करण्यात आलं आहे.

लष्करानं सांगितलं की, गेल्या चार दिवसांत उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन करण्यात आलं. यामध्ये उरी सेक्टरमधील रामपूरजवळ तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. हे तीन दहशतवादी पाकिस्तानातून काश्मीरमध्ये घुसले होते. सुरक्षा दलांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून 5 AK -47, 8 पिस्तूल आणि 70 हँड ग्रेनेड जप्त केले आहेत.

लष्करानं उरी सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाल पाहिली होती, त्यानंतर ऑपरेशन सुरू करण्यात आलं. उरी हेच सेक्टर आहे जिथं सप्टेंबर 2016 मध्ये लष्करावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून सूड घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा