मुंबई, ८ नोव्हेंबर २०२०: रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना आता अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात येत आहे. अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सरडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे. या तिन्ही आरोपींना मागील चार दिवसांपासून अलिबाग नगरपालिका शाळेत कैद्यांसाठी असलेल्या क्वारंटाइन सेंटर मध्ये ठेवण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांकडून यासंदर्भातील आदेश काढण्यात आल्याचे समजते.
दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींच्या यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालय उद्या (सोमवार) निर्णय देणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांना जामीन मिळणार की नाही याचा निर्णय आता उद्या होणार आहे. इंटिरियर डिझाईनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ४ नोव्हेंबरला अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अर्णव आणि इतर आरोपींना अलिबाग येथील नगरपालिकेच्या शाळेत तयार करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.
अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे. या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते. सध्या पोलिसांकडून या सगळ्याची अंतर्गत चौकशी सुरु आहे. मात्र, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी अर्णव गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्यात आल्याचे सांगितले जाते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे