इस्लामाबाद, २ ऑक्टोंबर २०२२: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना कधीही अटक होऊ शकते. वास्तविक, जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इस्लामाबादमधील मरगल्ला पोलीस ठाण्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जेबा चौधरी यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल इम्रान खान यांच्या विरोधात हे वॉरंट जारी केले आहे.
काही काळापासून इम्रान खान यांच्यावर सातत्याने कारवाईच्या चर्चा सुरू आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर अधिकारी आणि न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. इस्लामाबादचे सदर दंडाधिकारी अली जावेद यांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.
चार कलमांत गुन्हा दाखल
एफआयआरमध्ये पाकिस्तान दंड संहितेच्या (पीपीसी) चार कलमांचा समावेश आहे – ५०६ (गुन्हेगारी धमकीसाठी शिक्षा), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), १८९ (लोकसेवकाला दुखापत करण्याची धमकी), आणि १८८. इम्रान खान यांनी २० ऑगस्ट रोजी राजधानीत एका सार्वजनिक रॅलीत आपली सीमा ओलांडल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर काही तासांतच हे वॉरंट आले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे