पुणे १४ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना, केवळ लग्न जमत नसल्यामुळे एका तरुणाने ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे या तरुणाला पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत. तरुणाकडून ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती.
‘राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती. सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे कळते. विशेष म्हणजे सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे समजते.
शरद पवारांना भाजपच्या अमरावती येथील ‘सौरभ पिंपळकर’ या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचे आरोप झाले होते. पोलिस तपासात त्याने पवारांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचेही समोर आले आहे. याबरोबरच मी भाजपचा कार्यकर्ता आहे, ‘मी धर्मनिरपेक्षतेचा तिरस्कार करतो’ असा उल्लेखही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर असल्याचे समोर आले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.