अटक मटक डोनू तात्याला लागली सत्तेची चटक

वॉशिंग्टन, १६ नोव्हेंबर २०२०: जगभरात कोरोनानं हैदोस जरी घातला असला तरी जगातील विविध देशात निवडणूकीचा सण साजरा होताना पहायला मिळाले. अशातच संपूर्ण जगात महाशक्ती असणारा देश अमेरिकेची निवडणूक देखील या काळात पार पडली.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी चांगलीच चुरस पहायला मिळाली. अमेरिकेत सत्तेसाठी कशा पद्धतीनं नाटकं झाली हे संपूर्ण जगानं पाहिलं. एकीकडं रिब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प तर दुसरीकडं डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन दोघांनी शेवटपर्यंत राष्ट्राध्यक्ष पदासाठी प्रचार केला. इतिहासात कधी नाही ते अशी अतीतटीची निवडणूक पार पडली आणि सरते शेवटी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीचा आधीपासूनच डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं आपणच जिंकणार म्हणून विधान करत होते. पण, ते एव्हढ्यावरच न थांबता निवडणूकीचा निकाल स्पष्ट झाला आणि जो बिडेन यांनी विजय मिळवला तर त्यांनी थेट अमेरिकेतील लोकशाहीवरच प्रश्न चिन्हं उभे केलं.

“मी निवडणूक हरलोच नाही, मीच जिंकलो”असा नारा ट्रम्प अजूनही देतच आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेची अशी चटक लागलेली आहे की ते खुर्ची सोडून जायला तयारच नाहीत. किती काहीही झालं तरी पराभव स्विकारणारच नाही, असं त्यांनी जणू जाहीरच केलं आहे. त्यांनी पुन्हा ट्विट करत मीच जिंकलो असं म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हट्टापायीच त्यांचे समर्थक देखील रस्त्यावर उतरू लागले आहेत. ज्यामुळं अमेरिकेतील परिस्थिती ही खराब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे खुर्ची न सोडण्या मागचं कारण हे त्यांच्या भ्रष्टाचाराचं असून सत्तेवरून पाय उतार होताच त्यांना तुरुंगात टाकण्याचं भाकीत काही माध्यमातून होत आहे. तर ट्रम्प यांनी विरोधी पक्षांवरच घोटाळ्याचे आरोप केले आहेत.

ट्रम्प यांना कोणती भीती आहे?

बीबीसीच्या वृत्तानुसार, तज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कार्यकाळात कथित घोटाळ्यांच्या चौकशीत असं सुचवलं गेलं आहे की अध्यक्षपद गेल्यानंतर त्यांना गुन्हेगारी कारवायांव्यतिरिक्त कठीण आर्थिक परिस्थितीलाही सामोरं जावं लागू शकतं. याआधी ही कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न जर आपल्याला पडत असंल तर, राष्ट्राध्यक्ष असताना ट्रम्प यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही त्यामुळं आतापर्यंत ही कारवाई प्रलंबित होती.

पेस यूनिवर्सिटी मध्ये कॉनस्टीट्यूशनल लॉ चे प्राध्यापक बॅनेट गर्शमॅन यांनी सांगितलं की, या गोष्टीची संभावना आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अपराधिक खटले चालवले जातील. बॅनेट गर्शमॅन यांनी एक दशकासाठी न्यूयॉर्कमध्ये अभियोक्ता म्हणून काम केलं आहे. बॅनेट गर्शमॅन म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर बँक घोटाळा, कर घोटाळा, मनी लॉन्ड्रिंग, निवडणूक घोटाळे यासारख्या खटल्यांमध्ये कारवाई होऊ शकते. त्यांनी केलेल्या सर्व कामाचा संबंध आर्थिक गोष्टींशी आहे, अशी माहिती तेथील स्थानिक वृत्तसंस्था देत आहेत.

तथापि, हे प्रकरण एवढ्यावरच येऊन थांबणार नाही, तर प्रसारमाध्यमांच्या अहवालानुसार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला देखील सामोरं जावं लागणार आहे. या आर्थिक अडचणींमध्ये बहुदा त्यांनी घेतलेलं वैयक्तिक कर्ज तसंच व्यवसायामधील नुकसान या गोष्टींचा समावेश आहे. न्यूयॉर्क टाइम्स’च्या म्हणण्यानुसार, पुढील चार वर्षात डोनाल्ड ट्रम्प यांना तब्बल ३० कोटी डॉलर पेक्षा जास्त कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. तीसुद्धा अशावेळी करावी लागणार आहे ज्यावेळी त्यांची वैयक्तिक गुंतवणूक देखील चांगल्या स्थितीत नाही. सहाजिकच त्यांचं राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतर कर्ज दाते त्यांच्या मागं कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यास सुरुवात करतील.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे की, कायदेशीर आणि आर्थिक अडचणींमध्ये त्यांचं अध्यक्षपद हे त्यांचं चिलखत बनलं आहे. जर त्यांचं हे अध्यक्षपदच गेलं तर त्यांच्या कठीण दिवसांना सुरुवात होईल. अध्यक्ष ट्रम्प दावा करत आहेत की, ते आपल्या शत्रूंच्या कारस्थानांना बळी पडले आहे. तसंच ते म्हणाले की, अध्यक्षपद मिळण्यापूर्वी आणि अध्यक्ष पद मिळाल्यानंतर माझ्यावर अनेक गुन्हे केल्याचे आरोप देखील लावण्यात आले. ट्रम्प यांनी आपल्यावरील आरोप स्पष्टपणे नकारले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा