पुणे, १२ जून २०२३ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल होत आहे. दोन्ही पालख्यांचा पुण्यामध्ये दोन दिवस मुक्काम राहणार आहे. पालखीसाठी प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी आज आपल्या तिसऱ्या मुक्काम स्थळी म्हणजे पुण्याकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान ठेवले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम पुण्यात भवानी पेठेतील श्री पालखी विठ्ठल मंदिर, तर संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम श्री निवडुंगा विठोबा मंदिर नाना पेठ येथे असणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळी मंदिरांमध्ये पालखीचे आगमन झाल्यावर अभिषेक, पादुका पूजन आणि आरतीने पालख्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर रात्रभर भाविकांना पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. दोन्ही मंदिरांमध्ये उत्सव मंडपाच्या उभारणीसह विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे.
दरम्यान पालखी सोहळ्याची प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यात वारकऱ्यांच्या व्यवस्थेपासून सुरक्षेपर्यंत सर्व काळजी घेतली आहे. पुण्यात पालखी मुक्कामी असणाऱ्या दोन्ही मंदिराची बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पालखी मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. पालखी सोहळ्यातील भाविकांच्या गर्दीचे नियोजन, अनुचित घटना रोखण्यासाठी बंदोबस्ताचे नियोजन पोलिसांनी केली आहे.
पालखी पुण्यात असेपर्यंत वाहतुक बंद असणारे मार्ग पुढील प्रमाणे आहेत. (कंसात पर्यायी मार्ग)गणेशखिंड रस्ता (रेंजहिल्स चौक ते संचेती रुग्णालय) पर्यायी मार्ग- रेंजहिल्स-खडकी पोलीस ठाणे, पोल्ट्री चौक, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि रेंजहिल्स, सेनापती बापट रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता,फर्ग्युसन रस्ता (खंडुजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक) पर्यायी मार्ग- कर्वे रस्ता, सेनापती बापट रस्ता, रेंजहिल्स शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा ते स. गो. बर्वे चौक) पर्यायी मार्ग- कुंभार वेस, मालधक्का चौक, आरटीओ चौक, जहांगीर हॉस्पिटल, बंडगार्डन रस्ता टिळक चौक ते वीर चापेकर चौक, पर्यायी मार्ग- शास्त्री रस्ता, म्हात्रे पूल लक्ष्मी रस्ता (बेलबाग चौक ते टिळक चौक), पर्यायी मार्ग- शिवाजी रस्ता, हिराबाग टिळक रस्ता, शास्त्री रस्ता
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर