नवी दिल्ली, २६ मार्च २०२३: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेसच्या वतीने राजघाटावर आज दिवसभर ‘संकल्प सत्याग्रह’ केला जात आहे. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, जयराम रमेश, केसी वेणूगोपाल यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते या सत्याग्रहात सहभागी झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी नाकारली असून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने शिक्षा ठोठवल्यानंतर तसेच लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याने कॉंग्रेसकडून देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. केरळमधील वायनाडमध्ये कॉग्रेसने शनिवार हा काळा दिवस म्हणून पाळला होता. आज कॉंग्रेसकडून राजघाटावर ‘संकल्प सत्याग्रह’ करत आहे.
भाजप राहुल गांधींना बोलू देत नाही. राहुल गांधी देशासाठी आणि जनतेच्या हक्कासाठी लढत आहेत. असे कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचे कारण वाहतूक व्यवस्थापन दिले असून परिसरात crpc चे कलम १४४ लागू केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर