अरुणाचल प्रदेश: हिमवादळात लष्कराचे 7 जवान शहीद

5

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2022: उंच भागात झालेल्या हिमस्खलनात भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद झाले. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, हिमस्खलनाच्या ठिकाणाहून 7 शहीद जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. लष्कराचे जवान गस्तीवर होते, रविवारी आलेल्या हिमस्खलनात ते अडकले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहीद झालेले 7 जवान हे 19-जम्मू-काश्मीर रायफल्सचे आहेत.

राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जवानांच्या हौतात्म्यानंतर शोक व्यक्त केला आहे. अरुणाचल प्रदेशात हिमस्खलनात 7 जवान शहीद झाले हे कळून दुःख झाल्याचं ते म्हणाले. जवानांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती माझ्या संवेदना.

ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला शोक

दु:ख व्यक्त करताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, अरुणाचल प्रदेशातील हिमवादळात कर्तव्य बजावताना आपले 7 शूर सैनिक शहीद झाले. हे जाणून मनापासून दु:ख झालं. आपले जवान आमच्या सुरक्षेसाठी निस्वार्थपणे प्रयत्न करत आहेत. सैनिकांना माझा सलाम. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना.

पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले मृतदेह

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमस्खलनात अडकलेल्या जवानांचे मृतदेह भारतीय लष्कराने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बाहेर काढले. रविवारी तवांग सेक्टरमधील यांगत्सेजवळ चुमे गायतार भागात लष्कराचे जवान गस्त घालत होते. त्यावेळी हिमस्खलन झाला. बचाव कार्यात मदत करण्यासाठी विशेष पथकांना विमानाने पाठवण्यात आलं.

तवांग आणि पश्चिम कामेंगमध्ये खराब हवामान

तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांसह अरुणाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रतिकूल हवामान आणि मुसळधार बर्फवृष्टी होत आहे. चुमे गायतर क्षेत्र तवांगच्या जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा