अरुणाचल प्रदेश : भीषण आगीत ७०० दुकाने जळून खाक

5

इटानगर, २५ ऑक्टोबर २०२२: अरुणाचल प्रदेशातील इटानगर मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाहरलगुन डेली मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत ७०० हून अधिक दुकाने जळून खाक झाली आहेत. ही आग लागली असून नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप काही समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ च्या सुमारास प्रथम दिसलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, पहिल्या दोन तासांत केवळ दोनच दुकानांना आग लागली. ही दुकाने बांबू आणि लाकडापासून बनवलेली असल्याने आग वेगाने पसरली आणि त्यानंतर बघता बघता आगीने भीषण रूप धारण केले.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या परंतु आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला अपयश आले. या आगीत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, या मार्केटमधील दुकानदारांचा आरोप आहे की आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लगतच्या अग्निशमन केंद्राकडे धाव घेतली, परंतु कोणीही कर्मचारी सापडला नाही. पुढे अग्निशमन दलाचे जवान पोहोचले तेव्हा अग्निशमन दलाकडे पाणी नव्हते. अग्निशमन विभागाच्या या क्रिये विरोधात दुकानदारांनी घोषणाबाजी करत निराशा व्यक्त केली. तसेच या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा