नवी दिल्ली, २९ ऑगस्ट २०२३ : चीन आपल्या कुरघोड्यांच्या कृत्यांपासून परावृत्त होत नाहीए. चिनी सरकारनं २८ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे एक नवा नकाशा जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन हा आपला प्रदेश म्हणून घोषित केला आहे.
भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशवर चीनने पुन्हा एकदा दावा केला आहे. यावेळी चीनने नवा नकाशा जाहीर केला असून यामध्ये अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीन, तैवान आणि दक्षिण चीन समुद्राचा बहुतांश भाग असल्याचं नकाशात दाखवलं आहे. एप्रिल महिन्यात चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ गावांचं नामकरण केलं होतं. यावरून मोठा वादंग निर्माण झाला होता. आता नव्या नकाशात भारताचा भाग दाखवण्यात आल्याने पुन्हा एकदा सीमेवर वातावरण तापण्याची शक्यता आहे.
चीनच्या स्टॅण्डर्ड मॅप सर्व्हिस या संकेतस्थळावर नैसर्गिक संसाधन खात्याकडून चीनचा २०२३ चा अधिकृत नकाशा लॉन्च करण्यात आला, अशी माहिती चीनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने ट्वीट केली आहे. चायना डेलीच्या वृत्तानुसार, चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयानं सोमवारी झेजियांग प्रांतातील डेकिंग काउंटीमध्ये हा नकाशा जारी केला. या दरम्यान चीन नॅशनल मॅपिंग अवेअरनेस वीक साजरा करतो. दरम्यान, चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे मुख्य नियोजक वू वेनझोंग म्हणाले की, सर्वेक्षण, नकाशा आणि भौगोलिक माहिती राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी, जीवनाच्या सर्व स्तरांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. ते पुढे म्हणाले की, नकाशे आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनास समर्थन आणि मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे आपलं पर्यावरण आणि सभ्यता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
अक्साई चीन हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. १८६५ मध्ये, विल्यम जॉन्सननं भारत-चीन सीमेचं सर्वेक्षण केलं आणि जॉन्सन लाईननुसार, अक्साई चीन हा जम्मू आणि काश्मीरचा भाग असल्याचं सांगितलं. १८९९ मध्ये, एका ब्रिटीश सर्वेक्षणकर्त्यानं मॅकार्न मॅकडोनाल्ड लाईननुसार अक्साई चीनचा चीनचा भाग म्हणून वर्णन केलं. त्यानंतर ५० वर्षांनंतर चीननं अक्साई चीनवर कब्जा करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आणि १९५१ मध्ये याठिकाणी रस्ता बांधण्यास सुरुवात केली. या रस्त्यानं चीनचा शिनजियांग प्रांत तिबेटशी जोडला गेला होता. चीनच्या या कृतीकडे भारतानं फारसं लक्ष दिलं नाही आणि याचाच फायदा चीननं घेतला. कुरापतखोर चीननं १९५७ मध्ये १७९ किमी लांबीचा रस्ता बांधून आपला धुर्तपणा संपूर्ण जगाला दाखवून दिला. यानंतर १९६२ चे युद्ध झालं आणि भारताचा अक्साई चीन भाग चीननं हिसकावून घेतला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे