मुंबई, २३ मे २०२३: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज (२३ मे, मंगळवार) मुंबई दौऱ्यावर आहेत. येथे ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. केजरीवाल यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. संध्याकाळी ते मुंबईत दाखल होतील. त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही आहेत. दुसरीकडे खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढाही मुंबईत येत आहेत. यापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. आज संध्याकाळी मुंबईत आल्यानंतर ते उद्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
ममता बॅनर्जी यांच्याशिवाय अरविंद केजरीवाल यांनी मुंबईत येण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचीही भेट घेतली होती. केंद्राच्या अध्यादेशाला पाठिंबा देण्यासाठी ते विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारचा अधिकार मान्य केला आहे.
दुसरीकडे, केंद्र सरकारचा असा युक्तिवाद आहे की दिल्ली हे पूर्ण विकसित राज्य नाही, त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. अशा प्रकारे हे अधिकार दिल्लीच्या उपराज्यपालांकडे सोपवण्यात आले आहेत. केंद्र सरकारचा हा अध्यादेश राज्यसभेत रोखण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी मोहीम सुरू केली आहे. यासाठी ते वेगवेगळ्या राज्यात जाऊन विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड