मुंबई,७ डिसेंबर २०२२:अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा बऱ्याच महिन्यांपासून रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण आर्यन खान बॉलीवूडमध्ये एक नायक म्हणून नाही तर एक लेखक म्हणून पदार्पण करणार आहे.
https://www.instagram.com/p/Cl1JVwjqwPX/?igshid=MDM4ZDc5MmU=
स्वतः आर्यन खानने सोशल मीडियावर एक पोस्ट करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘लेखनाचं काम पूर्ण झाले आता ॲक्शन मिळण्याची उत्सुकता आहे.’ असे कॅप्शन देत आर्यनने एक फोटो चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. मात्र, त्याच्या या पोस्ट मधून चित्रपटाचे नाव, त्याचे कलाकार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
त्याचा या नवीन प्रोजेक्टवर अनेक चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव झाला आहे. शाहरुखने लिहिले आहे, ‘वाह..विचार केला..विश्वास ठेवला आणि आता अखेर स्वप्न पूर्ण होत आहे. पहिला प्रोजेक्ट नेहमीच खास असतो. तुला पहिल्या सिनेमासाठी खूप शुभेच्छा. तर ‘हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे’ असे आर्यनची आई गौरी खानने लिहिले आहे. यासोबतच अनन्या पांडेची आई भावना पांडे यांनी देखील खूप प्रेम… अशी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
या चित्रपटाची निर्मिती शाहरुख आणि गौरी यांचे प्रोडक्शन हाऊस असलेल्या ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ कडून केली जाणार आहे. आर्यन खानने लिहिलेल्या या चित्रपटाची उत्सुकता सर्वच चाहत्यांना आहे. त्यामुळे दिग्दर्शकाच्या भूमिकेला आर्यन कितपत न्याय देऊ शकेल हे येणार्या काळातच सिद्ध होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे