पुणे २९ नोव्हेंबर २०२४ : ‘आर्यन्स सन्मान’चे चित्रपट, नाटक क्षेत्रातील नामांकन आणि ‘आर्यन्स नवदुर्गा’ पुरस्काराचे वितरण रंगारंग कार्यक्रमात पार पडले. सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रातील विविध गोष्टींसाठी दिला जाणाऱ्या ‘आर्यन्स सन्मान’चे नामांकन जाहीर झाले आहे. यात सर्वोत्कृष्ठ चित्रपट विभागात ‘एक दोन तीन चार’, बापल्योक, स ला ते स ला ना ते, श्यामची आई, झिम्मा-२ यांनी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागात शशांक शेंडे, आदिनाथ कोठारे, निपुण धर्माधिकारी सिद्धार्थ चांदेकर, सुनील बर्वे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विभागात किरण खोजे, मृण्मयी देशपांडे, मुक्त बर्वे, गौरी देशपांडे, रिचा अग्निहोत्री यांनी नामांकन मिळवले आहे. या शिवाय सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, लक्षवेधी अभिनेता- अभिनेत्री या विभागातीलहि नामांकने या वेळी जाहीर झाली आहेत.
‘आर्यन्स सन्मान’चे हे दुसरे वर्ष असून पुण्यातील डीपी रोडवरील केशवबाग या ठिकाणी हा नामांकन सोहळा पार पडला. अनेक नामांकित चित्रपट आणि नाटकांमध्ये वेगवेगळ्या विभागात चुरस असल्याचे परीक्षक तसेच आयोजकांकडून यावेळी सांगण्यात आलय. ‘आर्यन्स सन्मान’च्या सोबतच ‘आर्यन्स नवदुर्गा’ या पुरस्काराचेही वितरण यावेळी पार पडले. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ महिलांना ‘आर्यन्स नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिस्टर लूसी कुरियन, आरती बनसोडे, ज्योती सचदे, तेजस्वी सेवेकरी, ताराबाई पवार, अहिल्या बर्डे, सायली पिलाने, पूजा धुरी, आदिती गोपीचंद स्वामी या नवदुर्गांना यावेळी त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘आर्यन्स नवदुर्गा’ पुरस्काराने गौरवले गेले.
या रंगारंग कार्यक्रम प्रसंगी आर्यन्स ग्रुपचे चेअरमन श्री.मुकुंद जगताप, CEO श्री.मनोहर जगताप, ओमा फाउंडेशनचे प्रमुख श्री.अजय जगताप आणि आर्यन्सच्या संचालकांनी उपस्थित कलाकार आणि मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी श्री. मनोहर जगताप यांनी ‘आर्यन्स पत्रकारिता’ पुरस्काराचीही घोषणा केली असून जानेवारी २०२५ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे. आर्यन्स ग्रुपचा एक भाग असणाऱ्या न्यूज अनकट चॅनेलचे पत्रकार कैलासवासी अनिल खळदकर यांच्या नावाने पत्रकारितेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. या सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील नामांकित कलाकार आणि तंत्रज्ञांनी हजेरी लावली. सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे अनेक मान्यवर आणि आर्यन्स परिवारातील सर्व सदस्य या सोहळ्याला उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी