साताळा येथील खडी क्रशरवर अद्याप ठोस कारवाई न केल्याने ता. २७, २८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद, २२ फेब्रुवारी २०२३ : साताळा (ता. फुलंब्री) येथील खडी क्रशरमुळे त्रस्त नागरिकांतर्फे मंगळवारी (ता. १३) औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या खडी क्रशरमुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होत आहे. तरी संबंधितांवर गुन्हे दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली होती आहे.

या रास्ता रोको आंदोलनावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने आठ दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते; मात्र पुढील आठ दिवसांत चौकशी होऊन कारवाई न झाल्यास फुलंब्री तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. फक्त चौकशीचे आदेश देण्यात आले; मात्र अद्यापपर्यंत ठोस कारवाई न झाल्याने येत्या सोमवारी (ता. २७) व मंगळवारी (ता. २८) संपूर्ण गावकऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संवैधानिक पद्धतीने निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात फुलंब्री येथील तहसील कार्यालयात; तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद, जिल्हा परिषद कार्यालय औरंगाबाद आदींना पत्रव्यवहार करण्यात आले असल्याचे मंगेश साबळे यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा