घराबाहेर पडला म्हणून सख्ख्या भावाची हत्या

मुंबई : संपूर्ण देशात करोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा “लॉकडाऊन” जाहीर केला आहे. यामुळे नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे लोक घराबाहेर पडू नयेत, यासाठी पोलिसांकडून कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मात्र , मुंबईत लॉकडाऊन असतानाही घराबाहेर पडला म्हणून एका व्यक्तीने आपल्याच भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्‍कादायक प्रकार कांदिवलीत घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत समतानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश लक्ष्मी ठाकूर याने लॉकडाऊन आहे. त्यामुळे घराबाहेर निघू नको असं वारंवार सांगूनही मोठा भाऊ दुर्गेश याने न ऐकल्याने त्याची हत्या केली असल्याचे समोर आले आहे.
दुर्गेश हा पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. करोनामुळे कंपनीतील कामकाज बंद असल्याने तो आपल्या घरी परतला होता. दुर्गेश बाहेरून घरी आला तेव्हा आरोपी आणि त्याच्या पत्नीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर आरोपीने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दुर्गेशला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले होते, पण त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा