गोल पोस्ट इतर कानपिचक्या नाशिक येथे नायलॉन मांजामुळे संक्रांतीपासून आजपर्यंत तब्बल ३० पक्षी गंभीर; तर १३...

नाशिक येथे नायलॉन मांजामुळे संक्रांतीपासून आजपर्यंत तब्बल ३० पक्षी गंभीर; तर १३ पक्ष्यांना गमवावा लागला जीव

पुणे, २० जानेवारी २०२३ : नाशिक शहरात संक्रांतीपासून आजपर्यंत तब्बल ३० पक्षी नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाले असून, त्यातील १३ पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यातील काही पक्ष्यांच्या पंखांना गंभीर दुखापत झाल्याने ते आयुष्यभरासाठी जायबंदी झाले आहेत.

नाशिक शहरात पोलिस आयुक्तांनी नायलॉन मांजाला प्रतिबंध घालत विक्री, वापर किंवा जवळ बाळगण्याला बंदी घालण्यात येऊन ठिकठिकाणी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला; तसेच विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची मजा लुटण्यासाठी ठिकठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करण्यात आला होता.

संक्रांतीपासून ते आजपर्यंत ‘इको एको फाउंडेशन’च्या रेस्क्यू टीमने सुमारे ३० पक्षी त्यामध्ये घार, घुबड, पोपट आदी पक्ष्यांच्या पंखांमध्ये नायलॉन मांजा मोठ्या प्रमाणावर अडकल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यातील काही पक्षी जास्त जखमी झाल्याने ते गतप्राण झाले होते, तर काही पक्ष्यांच्या पंखांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने ते आयुष्यभर उडू शकणार नाहीत. ‘इको एको फाउंडेशन’च्या वैभव भोगले, अभिजित महाले, अरुण अय्यर, अमित लवाळे, आयुष पाटील, शर्ली रेखी, शंतनू पवार, सिद्धी पंचार्य, सागर पाटील, समर्थ महाजन, पूजा लढ्ढा, वृषाली वैद्य, ऋत्विक पाटील आदींच्या टीमने शहरातील विविध भागांतून जखमी पक्षी आणून पशुवैद्यकीय अधिकार्‍यांच्या मदतीने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही केल्या.

नायलॉन मांजाचा वापर करू नये याकरिता पोलिस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली; मात्र तरीही नागरिकांमध्ये त्याबाबत अद्यापही जनजागृती झाली नसल्याचे जखमी पक्ष्यांची अवस्था बघून लक्षात येते. यापुढे पोलिस प्रशासनातर्फे विक्रेत्यांवर कारवाईसोबतच नायलॉन मांजा बनविणार्‍यांवर थेट कारवाईचा बडगा उचलला पाहिजे, अशी पक्षीप्रेमींची मागणी आहे.

घुबडाला जीवदान
वडाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये अडकून घुबड पक्षी जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत घुबडाला अग्निशमन दलाच्या जवानांनी लाकडी बांबूच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. नवीन नाशिकमधील दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळील एका वडाच्या झाडावर नायलॉन मांजामध्ये घुबड पक्षी अडकल्याची माहिती तेथील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली होती. यावेळी अग्निशमन दलाचे रवींद्र लाड, रवींद्र आमले, वाहनचालक इस्माईल काझी त्वरित घटनास्थळी दाखल होत संजय गाडेकर यांनी झाडावर चढून बांबूच्या मदतीने नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या घुबडाला सुखरूपपणे बाहेर काढून उपचारासाठी प्राणी मित्र यांच्याकडे सोपविले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version