आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर कोर्टाचा निर्णय

गांधीनगर, ३१ जानेवारी २०२३ : स्वयंघोषित संत आसाराम बापूला गांधीनगर कोर्टाने मोठा धक्का दिला असून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुणावली आहे. आसारामला सूरत येथील आपल्या अनुयायी असलेल्या महिलेवर बलात्कार प्रकरणी हा निकाल दिला आहे.

अहमदाबादमधील चांगखेडा पोलीस ठाण्यात दाखल FIR नुसार, आसारामने २००१ ते २००६ या काळात आपल्या आश्रमात राहणाऱ्या एका महिलेवर अनेकदा बलात्कार केला होता. याप्रकरणी पीडित महिलेच्या आरोपानंतर २०१३ मध्ये प्रत्यक्ष गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी ६८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते.

या प्रकरणात आसाराम व्यतिरिक्त त्याची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती आणि चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा आरोपी आहेत. काल या प्रकरणातील इतर सहा आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. याच प्रकरणात आता गांधीनगर कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने आसाराम बापूला २३ हजारांचा दंडदेखील ठोठावला आहे. तसेच पीडितेला ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान, देशभरात आसारामचे ४०० पेक्षा जास्त आश्रम आणि ४० शाळा असून, आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारतीच्याच हाती आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा