Ashadhi Wari preparation update: अवघ्या १०-११ दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याची तयारी श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीत अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पंढरीकडे जाणाऱ्या वारकऱ्यांची आणि विविध दिंड्यांची लगबग सध्या शिगेला पोहोचली आहे. पायी वाटचालीत वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी आवश्यक असलेले तंबू खरेदी आणि दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, भजनासाठी लागणारे पखवाज आणि इतर भजन साहित्याची दुरुस्ती, खरेदी तसेच अन्य आवश्यक कामांची धावपळ सुरू आहे.
मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळा संस्था दिंडी क्र.३३ चे सचिव ह.भ.प. सुदाम भेगडे, पवन मावळ दिंडीचे सचिव ह.भ.प. उत्तम बोडके, श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. मुकुंद महाराज राऊत, वैकुंठवासी ह.भ.प. महादेवब्रुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज काळोखे आणि श्रीनाथसाहेब प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. माऊली नाणेकर यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वारीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली आहे.
भजन साहित्याची नवी खरेदी आणि दुरुस्ती
दिंड्यांकडे असलेले सर्व पखवाज दुरुस्त करण्यात आले आहेत, ज्यात शाई भरणे, ओढ काढणे, पान बदलणे यांसारखी कामे आळंदी आणि देहू येथील निष्णात कारागिरांकडून करून घेण्यात आली आहेत. गरजेनुसार नवीन भजन साहित्याचीही खरेदी करण्यात आली आहे. टाळ, वीणा यांसारखे साहित्य दुरुस्त केले आहे, तर वाटचालीत दुर्मिळ होणारे काही साहित्य आणि किराणा खरेदीची कामेही वेगाने सुरू आहेत.
वारीमधील सोयीसुविधांवर भर;
पवन मावळ प्रासादिक दिंडी क्र. ३२ चे सचिव ह.भ.प. उत्तम बोडके यांनी सांगितले की, दिंडीतील सभासद आणि वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसह देणगीदार व पंगत देणाऱ्या भाविकांना कार्यक्रमपत्रिका व माहितीपत्रिका वाटप करण्यात येत आहे. श्रीनाथसाहेब प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर (माऊली) नाणेकर यांनी वारकऱ्यांना पंगत देणारे भाविक व देणगीदारांशी संपर्क साधल्याचे सांगितले. तसेच, दिंडीतील किराणा सामान, तंबू, वारकऱ्यांचे बिछाने (वळकटी) ठेवण्यासाठी वाहनांची व्यवस्था आणि पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली आहे.
मुळशी तालुका वारकरी दिंडी संस्था, दिंडी क्र.३३ चे सचिव ह.भ.प. सुदाम भेगडे यांनी पालखी सोहळ्यात दिंडीचा मुक्काम असणाऱ्या विविध ठिकाणांची पाहणी पूर्ण केल्याचे सांगितले. श्रीक्षेत्र घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. मुकुंद महाराज राऊत यांनी यंदा अधिक पावसाची शक्यता असल्याने गैरसोय टाळण्यासाठी सभासदांना कामांचे वाटप केले आहे असे नमूद केले. वैकुंठवासी ह.भ.प. महादेवबुवा काळोखे मुकादम प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. संतोष महाराज काळोखे यांनी वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन सर्व तंबूंची दुरुस्ती आणि डागडुजी केली असून, आवश्यकतेनुसार नवीन तंबूही खरेदी केल्याची माहिती दिली. या सर्व तयारीमुळे वारकऱ्यांचा पायी प्रवास सुकर होईल आणि पंढरीच्या विठुरायाच्या भेटीची आस आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे










































