आषाढी वारीसाठी पिंपरी-चिंचवड प्रशासन सज्ज: वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य

22
Pimpri-Chinchwad ready for Ashadhi Wari
आषाढी वारीसाठी पिंपरी-चिंचवड प्रशासन सज्ज: वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य

Pimpri-Chinchwad ready for Ashadhi Wari: आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतः आढावा घेत, सर्व यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. या वर्षीच्या आषाढीवारीसाठी प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

सोमवारी (२ जून रोजी) आयुक्त शेखर सिंह यांनी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीच्या आकुर्डी येथील मुक्कामाच्या ठिकाणाची आणि नियोजित वारकरी भवनाच्या जागांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शहर अभियंता मकरंद निकम, सहशहर अभियंता देवन्ना गट्टवार, उपायुक्त अण्णा बोदडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज संस्थान आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.

आयुक्तांनी पालखी विसाव्याच्या ठिकाणांची पाहणी करताना, वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पालखी मार्गावरील राडारोडा तातडीने उचलून परिसराची तसेच पालखी मार्गाची साफसफाई करण्यावर त्यांनी भर दिला. पावसाचे पाणी कुठेही तुंबणार नाही, याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.

जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवड शहरात १९ जून रोजी आगमन होणार असून, पालखीचा मुक्काम आकुर्डी येथे असेल. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २० जून रोजी पिंपरी-चिंचवड हद्दीत दाखल होऊन त्याच दिवशी पुण्याकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासनाने कंबर कसली असून, वारी सुकर आणि सुखकर होईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे