आषाढी वारीसाठी देहूनगरी सज्ज; तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान!

13
Ashadhi Wari 2025 Tukaram Palakhi Departure from Dehu
आषाढी वारीसाठी देहूनगरी सज्ज;

Ashadhi Wari 2025 Tukaram Palakhi Departure from Dehu: आषाढी वारीच्या पवित्र पर्वासाठी देहूनगरी पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी शहर पूर्णपणे सज्ज झाले असून, राज्यभरातील हजारो वारकऱ्यांच्या दिंड्या देहूत दाखल झाल्या आहेत. यंदा वारकरी आणि भक्तांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधांसाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे.

आज, बुधवारी, देहू नगरीतून तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. वारीचा उत्सव ‘ज्ञानदेव तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून जात असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. मुख्य मंदिराचा कळस फुलांनी सुंदररित्या सजवण्यात आला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वेलवाडीतील भागीरथीमाता मंदिर आणि विठ्ठलनगर चिंचोली परिसरात मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली आहे, जिथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभाव यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळत आहे.

पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि वारीतील नियमांचे पालन करून मार्गक्रमण करतील, अशा सूचना संबंधित दिंडी चालक, मालक आणि फडकरी यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सोहळाप्रमुख दिलीपमहाराज मोरे यांनी दिली. पालखी रथासाठी जनरेटर आणि विद्युत व्यवस्था नव्याने करण्यात आली असून, रथाचे पेंटिंग आणि ब्रेक सिस्टिमची तपासणी देखील करून घेण्यात आली आहे. महावितरणने विद्युतपुरवठा सुरळीत ठेवण्याची खबरदारी घेतली आहे, तर मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी नगरपंचायत आणि स्कॉट सेवा संस्थेचे स्वयंसेवक अथकपणे काम करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे