पंढरपूर, दि.१३जून २०२० : गेल्या ३ महिन्यापासून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. ३० जून रोजी लॉकडाऊन संपत असून १ जुलै आषाढी एकादशी आहे. या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पंढरपूर शहरातील नागरीकांसाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठलाचे दर्शन खुले करावे, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दिले आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी शासनाने देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद केली होती. यामुळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रार्दुभाव होवू नये यासाठी यंदा आषाढी वारी निमित्तचा पायी दिंडी सोहळा रद्द करण्यात आला आहे. १ जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर शहरातील नागरीकांना शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी मंदिर खुले करावे अशा मागणीचे निवेदन नगरसेवक विक्रम शिरसट यांनी आज मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना दिले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: