आषाढी वारी सोहळ्यासाठी माऊलींच्या अश्वांचे परंपरेनुसार प्रस्थान

बेळगाव, दि.२ जून २०२० : कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे बाहेर पडता येत नाही. मात्र नियम म्हणून आज( मंगळवारी) आम्ही पूजा करुन माऊलींचे अश्व आळंदीच्या व पंढरपूरच्या दिशेने पाच पावले चालवून पुन्हा वाड्यात आणले . सद्गुरु श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने अशी वेळ भविष्यात कधी येऊ नये ही त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व परंपरेने चालणाऱ्या नियमांचे पालन आम्ही घरीच करणार आहोत. अंकलीच्या वाड्यात सद्गुरु श्रीमाऊलींचे सुंदर प्राचिन मंदिर आहे. तिथेच सर्व उपचार पार पडतील सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा असे आवाहन श्रीमंत श्रीउर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी केले आहे.

दरवर्षी माऊलींच्या पालखीची खरी सुरुवात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्याच्या अंकली गावातून होते. या अंकली गावाचे शितोळे सरकार यांना या माऊलींच्या पालखीचा व अश्वांचा मान देण्यात आला आहे. शिवाय गेल्या १८४ वर्षांपासून शितोळे सरकार ही परंपरा चालावत आहेत.

शितोळे सरकार यांच्या वाड्यातून या पालखीची विधिवत पूजा करण्यात आली. पालखीची दिंडी काढून सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीमंत उर्जित सिंहराजे व त्यांचे चिरंजीव श्रीमंत राजे कुमार महंत शितोळे यावेळी उपस्थित होते. अंकलीहून दररोज ३० किमीचा प्रवास करत १० दिवसात ही पालखी ३०० किमी अंतर पार करून आळंदीत पोहचतात. मात्र यंदाच्या वर्षी हा पालखी सोहळा घरी राहूनच साजरा करण्यात येणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा