नागपूर १५ जून २०२३ : काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांविषयी आशिष देशमुख यांनी वारंवार पक्ष विरोधी विधाने केल्यामुळे त्यांना काँग्रेस मधून निलंबित करण्यात आले. त्यानंतर आशिष देशमुख हे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते आता भाजप पक्षात प्रवेश करणार आहेत.
मध्यंतरी आशिष देशमुख हे तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना भेटले होते. तर केसीआर यांनी देशमुख यांना भारतीय राष्ट्र समिती पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे ते केसीआर यांच्या पक्षात प्रवेश करतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु याच दरम्यान त्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर भेट झाली आणि दुसऱ्या वेळी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यामुळे ते काहीतरी निर्णय घेतील असा अंदाज लावला जात होता.
ते कोणत्या पक्षात जातील यावरती तर्कवितर्क लढवले जात होते. आशिष देशमुख हे पुन्हा भाजप मध्ये जाऊन घरवापसी करतील अशा चर्चा ही रंगल्या. परंतु त्याला मुहूर्त मिळत नव्हता. त्यानंतर आशिष देशमुख यांचा आता पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. १८ जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. देशमुख ६ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. देशमुख यांनी यापूर्वी काटोल मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. भाजपकडून सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर











































