मुरजी पटेलांच्या कार्यकर्त्यांना आशिष शेलारांचं आवाहन

मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२ : भारतीय जनता पार्टीनं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार असून यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान, भाजपनं आपल्या या निर्णयावर अधिकृतरित्या प्रतिक्रिया दिली असून आम्ही महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी आशिष शेलार म्हणाले, भारतीय जनता पार्टीचं नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संपूर्ण जनतेचं समर्थन आहे. भाजपानं घेतलेला हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केला असून त्यातील सगळे पैलू आता समोर आले आहेत. भाजपनं घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा-परंपरेला उच्च स्तरावर नेणारी आहे. तसेच स्वत: उमेदवार मुरजी पटेल यांनीदेखील त्याबद्दलची कार्यवाही केली आहे.

दरम्यान भाजपाच्या या निर्णयानंतर मुरजी पटेल यांच्या काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे, याबाबत विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, मी समस्त भाजपाच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवावी. दोन महिन्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ऊर्जेचा आपण उपयोग नक्की करू. पक्षाचा निर्णय कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं, हे स्वाभाविक आहे. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर भाजपनं ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे असे समोर आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा