कोलंबो, १२ सप्टेंबर २०२३ : विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची नाबाद शतके आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर, भारताने सोमवारी येथे पावसाने प्रभावित झालेल्या आशिया कप सुपर फोरच्या सामन्यात पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध धावांच्या बाबतीत भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. भारताच्या ३५७ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीपच्या (२५ धावांत पाच विकेट) दमदार चेंडूंसमोर पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत १२८ धावांत गडगडला.
रविवारी सततच्या पावसामुळे हा सामना मध्यंतरी थांबवावा लागला आणि हा सामना सोमवारी राखीव दिवस म्हणून खेळवण्यात आला. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाने पाचव्या षटकातच इमाम उल हकची विकेट गमावली, ज्याला जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर शुभमन गिलने झेलबाद केले.
२४ चेंडूत १० धावांची संथ खेळी खेळल्यानंतर कर्णधार बाबर आझमलाही ११ व्या षटकात हार्दिक पांड्याने त्रिफळाचीत केले. यानंतर पावसामुळे तासाभराहून अधिक काळ खेळ थांबला होता. खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा शार्दुल ठाकूरने चौथ्या चेंडूवर मोहम्मद रिझवानला (०२) यष्टिरक्षक राहुलकडे झेलबाद करून पाकिस्तानची धावसंख्या तीन विकेट्सवर ४७ धावांवर नेली.
त्यानंतर सलामीवीर फखर जमान आणि आगा सलमानने डाव पुढे नेला. डावखुरा फिरकीपटू कुलदीपच्या चेंडूवर रोहितने त्याला जीवदान दिले. फखर २१ धावांवर भाग्यवान ठरला. मात्र, फखरला या जीवदानाचा फायदा उठवता आला नाही आणि २७ धावा केल्यानंतर तो पुढच्याच षटकात कुलदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. कुलदीपने सलमानला (२३) LBW पायचीत केले आणि पाकिस्तानची धावसंख्या पाच गडी बाद ९६ अशी झाली.
पाकिस्तानचे धावांचे शतक २५ व्या षटकात पूर्ण झाले. कुलदीपने सलग षटकात शादाब खान (०६) आणि इफ्तिखार (२३) यांना बाद केले. कुलदीपच्या पुढच्या षटकात शाहीन शाह आफ्रिदीने (नाबाद ०७) डावातील पहिला षटकार ठोकला पण तीन चेंडूंनंतर फहीम अश्रफला (०४) बाद करून भारताचा विजय निश्चित केला.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड