आशिया कपमध्ये पाकिस्तानची विजयी सुरुवात, नेपाळचा २३८ धावांनी केला पराभव

6

पुणे, ३१ ऑगस्ट २०२३: आशिया चषकात पाकिस्तानने विजयाने सुरुवात केली आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमच्या संघाने नेपाळचा २३८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने नेपाळसमोर ३४२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ १०४ धावांत गडगडला. नेपाळकडून सोमपाल कामीने २८ आणि आरिफ शेखने २६ धावा केल्या. मात्र, पाकिस्तानकडून शादाब खानने ४ विकेट्स घेतले.

अ गटातील या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सहा विकेट्सवर ३४२ धावा करत नेपाळचा डाव २३.४ षटकांत १०४ धावांत गुंडाळला. दोन्ही देशांमधील हा पहिलाच एकदिवसीय सामना असून नेपाळच्या गोलंदाजांच्या अननुभवीचा पुरेपूर फायदा पाकिस्तानच्या फलंदाजांनी घेतला. नेपाळच्या क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी करत पाकिस्तानच्या फलंदाजांना आणखी २५ ते ३० धावा करण्याची संधी दिली.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सोमपाल आणि करणने चिवट गोलंदाजी केली आणि सहाव्या षटकात नेपाळला फायदा झाला. फखर जमान ( १४ ) झेलबाद झाला, पुढच्याच षटकात इमाम उल हक (पाच) धावबाद होऊन कर्णधार रोहित पौडेलच्या अचूक थ्रोवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रिझवान ४४ धावांवर तर आगा सलमान ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने नेपाळविरुद्ध सहा विकेट्सवर ३४२ धावांची मोठी धावसंख्या उभारली. दोन्ही देशांमधला हा पहिलाच एकदिवसीय सामना होता आणि पाकिस्तानच्या फलंदाजांनी नेपाळच्या गोलंदाजांच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवला. बाबरने १३१ चेंडूंत १४ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १५१ धावा केल्या, तर इफ्तिखारने ७१ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १०९ धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा