युद्ध असो की क्रिकेट; दोन्ही ठिकाणी मानसिकता महत्त्वाची असते. मानसिकदृष्ट्या ज्या देशाचे सैन्य आणि क्रिकेटपटू अधिक सुदृढ असतात, त्या देशाला विजय मिळतो. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला कठोर उत्तर दिले. त्यानंतर झालेल्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेतही भारतासाठी विजय मिळवणे महत्त्वाचे होते. आधीच मानसिकदृष्ट्या खचलेल्या पाकिस्तानवर विजय मिळवणे भारतासाठी तुलनेने सोपे ठरले. भारताने ते साध्य केले.
‘तुम्ही आमचे ध्येय काय आहे असे विचारता? उत्तर फक्त एकच शब्द आहे – विजय. कोणत्याही किंमतीत विजय. दहशतीतही विजय. मार्ग कितीही कठीण असला तरी आपण जिंकलेच पाहिजे,’ असे दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा संसदेत भाषण करताना विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले होते. रविवारी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताची परिस्थिती अशीच होती. पहलगाम हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या वातावरणात पराभवाचा प्रश्नच नव्हता. अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव भारतीयांसाठी असह्य झाला असता. जिंकणे हा एकमेव पर्याय होता. आणि तो विजय २२ वर्षीय तरुण फलंदाज तिलक वर्मा यांनी मिळवून दिला. प्रचंड दबावाखाली त्याने स्वतःला ‘हीरो’ सिद्ध केले.
तिलकच्या कारकिर्दीतील सर्वात मौल्यवान डावाची चर्चा व्हायलाच हवी. १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था २० धावांवर ३ बाद अशी होती. अंतिम सामन्यापूर्वी प्रत्येक सामन्यात खळबळ उडवणारा अभिषेक शर्मा पाच धावांवर बाद झाला. कर्णधार सूर्यकुमार यादव फक्त एक धाव करू शकला. शुभमन गिललाही १२ धावांपर्यंत पोहोचता आले नाही. यानंतर वर्माने प्रथम संजू सॅमसनसोबत ५७ धावांची भागीदारी केली आणि नंतर शिवम दुबेसोबत ६० धावांची भागीदारी करून भारताचा विजय निश्चित केला. शेवटी, स्पर्धेतील पहिला सामना खेळणाऱ्या रिंकू सिंगने शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारत भारताचा विजय निश्चित केला.
महेंद्रसिंह धोनीसारखा संयम आणि विराटसारखे फिनिशिंग तिलक वर्माच्या खेळीत दिसले. त्याच्यावर धोनी आणि विराट यांचा प्रभाव स्पष्ट जाणवला. एकदा तो स्थिरावल्यानंतर विराट कोहलीप्रमाणेच त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तिलकने आपल्या डावाच्या पहिल्या २६ चेंडूंमध्ये २४ धावा काढल्या; पण पुढच्या २७ चेंडूंमध्ये तब्बल ४५ धावा केल्या. कठीण परिस्थितीत त्याने एकेरी-दुहेरीवर भर देत धावसंख्या पुढे नेली. एकेरी-दुहेरीतून त्याने ३३ धावा तर चौकार-षटकारांतून ३६ धावा केल्या.
पहिल्या १२ षटकांत पाकिस्तानचा डाव जोरात वाटत होता. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानने एकही विकेट गमावली नाही. १२ षटकांत पाकिस्तानची धावसंख्या १ बाद १०७ अशी होती. साधारणपणे टी-२० क्रिकेटमध्ये १२ षटकांचा स्कोअर दुप्पट होतो, त्यामुळे पाकिस्तान दोनशे धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. पण यानंतर भारतीय फिरकीपटूंनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले.
१३ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कुलदीप यादवने सैम अयुबची विकेट घेतली आणि तिथून पाकिस्तानचा पडझड सुरू झाला. १७ व्या षटकात कुलदीपने तीन बळी घेतले. अखेर पाकिस्तान १९.१ षटकांत १४६ धावांवर ऑलआउट झाला.
सुपर फोर सामन्यानंतर पाकिस्तानी गोलंदाज हरिस रौफने विमान अपघाताचे संकेत देत भारतीय खेळाडू आणि चाहत्यांना चिडवले होते. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सहा भारतीय विमाने पाडल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. रौफने त्याचाच संदर्भ दिला होता. मात्र अंतिम सामन्यात रौफ स्वतःच अपघातग्रस्त ठरला. तो सामन्यातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला आणि त्याने ३.४ षटकांत ५० धावा दिल्या. शेवटी जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले आणि त्याच त्याच्या शैलीत विमान अपघाताचे संकेत देत प्रत्युत्तर दिले.
स्पर्धेतील खेळाडू – अभिषेक शर्मा
भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याने तीन अर्धशतकांसह ३१४ धावा केल्या आणि त्याचा ‘स्ट्राईक रेट’ दोनशे होता. एकाच टी-२० आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला.
भारताचा वर्चस्व कायम
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा हा पाकिस्तानवर सलग आठवा विजय होता. २०२२ च्या आशिया कपनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. आता पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात पुन्हा सामना होणार आहे. भारत या स्पर्धेचा यजमान असला तरी पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या आशिया कप अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करून नवव्यांदा आशियाई अजिंक्यपद पटकावले. ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा करणारा तिलक वर्मा हा भारताच्या विजयाचा खरा नायक ठरला.
ट्रॉफीवरून वादंग
सामना मध्यरात्री संपला; पण बक्षीस समारंभ पहाटे सव्वा वाजेपर्यंत सुरू झाला नाही. कारण, भारतीय क्रिकेट संघाने पीसीबी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री आणि पीसीबीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्याविषयी भारतीय संघाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ट्रॉफी समारंभ दीड तास उशिरा सुरू झाला.
भागा वरखडे












































