पुणे, ६ सप्टेंबर २०२३ : उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव करत पुरुष क्रिकेटच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी ते योग्य दाखवून देत बांगलादेशला २० षटकांत ९ गडी गमावून ९६ धावांवर रोखले.
प्रत्युत्तरादाखल भारताने ९.२ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात ९७ धावा करत सहज विजयाची नोंद केली. भारतीय संघ प्रथमच या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालची विकेट गमावली, त्याला खातेही उघडता आले नाही. कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड (२६ चेंडूत नाबाद ४०, चार चौकार, तीन षटकार) आणि तिलक वर्मा (२६ चेंडूत नाबाद ५५, दोन चौकार, सहा षटकार) यांनी भारतासाठी ९७ धावांची अखंड भागीदारी केली.
सुवर्णपदकाच्या लढतीत भारताचा सामना शनिवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. याआधी साई किशोर हा भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने १२ धावांत तीन विकेट्स घेतल्या. वॉशिंग्टन सुंदरनेही १५ धावांत २ विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली. गायकवाड आणि वर्मा यांनी छोट्या मैदानावर चौकारांवर भर देत सर्वाधिक धावा केल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड