आसाममध्ये बालविवाह प्रकरणी मोठी कारवाई, ८०० जणांना अटक

आसाम, ३ ऑक्टोबर २०२३ : आसाममध्ये आज मोठी कारवाई करण्यात आली आहे. बालविवाह प्रकरणी राज्यभरात आत्तापर्यंत ८०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आसाम पोलिसांनी राज्यात बालविवाह विरुद्धची मोहीम पुन्हा सुरु केली असून, ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी दिली आहे.

गेल्या महिन्यात पोलिसांनी आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यात वेगवेगळ्या कारवायांमध्ये १७ बनावट काझी ताब्यात घेतले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाम पोलिसांनी दोन ऑक्टोबर रोजी कोक्राझार, बोगाईगाव आणि थुकरी येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. गोसाईगाव, सेरफांगुरी, काचुगाव, बोगारीबारी येथून एकूण २४ जणांना अटक करण्यात आली. बोगाईगाव येथून ३९ तर धुबरी जिल्ह्यातून १९१ जणांना अटक करण्यात आली आहे.

तत्पूर्वी आसामचे मुख्यमंत्री यांनी ९ सप्टेंबर रोजी घोषणा केली होती की, त्यांचे सरकार राज्यात बालविवाहा विरुद्ध आपली मोहीम पुन्हा सुरु करणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान या संदर्भात घोषणा केली होती. या मोहिमेतंर्गत बालविवाह प्रकरणी पुढील दहा दिवसांत आणखी दोन ते तीन हजार जणांना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा