नवी दिल्ली, १७ ऑगस्ट २०२३ : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची तयारी भाजपने सुरू केली आहे. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शाह पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित राहणार आहेत. अद्याप विधानसभा निवडणुकीची घोषणा झालेली नाही. आतापर्यंत निवडणुका जाहीर झाल्यानंतर बैठका होत होत्या. पण,सध्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच बैठक घेण्यात आली आहे. त्यामुळे आतापासून भाजप या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे का?
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांची नावे निश्चित करते. तसेच निवडणुकीची रणनीती ठरवते. मध्य प्रदेश,राजस्थान,छत्तीसगडसह पाच राज्यांच्या निवडणुकीची तयारी या बैठकीच्या माध्यमातून भाजप सुरू करत आहे. या बैठकीत भाजपच्या कमकुवत असलेल्या जागांवर चर्चा करण्यात येईल. निवडणुका जिंकण्यासाठी मध्य प्रदेश, छत्तीसगडचा विचार केला जात आहे.
कर्नाटकात १० मे रोजी निवडणुका झाल्या. परंतु, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ९ एप्रिल रोजी झाली होती. निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा ३० मार्च रोजी केली. भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी दहा दिवसांनी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक घेतली. फक्त कर्नाटकच नव्हे तर गुजरात आणि हिमाचल प्रदेशातही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती.
गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा चार नोव्हेंबर २०२२ ला झाली. मतदान एक आणि पाच डिसेंबरला झाले. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक ९ नोव्हेंबर २०२२ ला झाली. गुजरात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पाच दिवसांनी बैठक झाली होती. हिमाचल विधानसभा निवडणुकीची घोषणा १४ ऑक्टोबरला झाली. त्यानंतर १२ नोव्हेंबरला मतदान झाले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निवडणूक घोषणेच्या आधीच १३३ जागांवरील आपले उमेदवार जाहीर केले होते. हाच फॉर्म्यूला वापरून काँग्रेस मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काम करत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सप्टेंबरपर्यंत उमेदवार जाहीर करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाला गळ घातली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर