मणिपूरमध्ये आजपासून विधानसभेचे अधिवेशनाला सुरुवात

मणिपूर, २९ ऑगस्ट २०२३ : मणिपूरमध्ये आजपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. ३ मे रोजी सुरू झालेल्या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच मणिपूरमध्ये विधानसभेचे अधिवेशन होणार आहे. पण या अधिवेशनात आमदारांना प्रश्न विचारता येणार नाहीत. या अधिवेशनात १० कुकी आमदारांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी सुरक्षेचा हवाला दिला आहे.

विधानसभेचे अधिवेशन बोलवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. परंतु राज्यपालांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली नाही, याच कारणामुळे विधानसभेचे अधिवेशन बोलावण्यात आले नाही. नियमानुसार विधानसभेच्या दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. २१ ऑगस्ट रोजी राज्यपालांनी अधिसूचना जारी केली. कुकी-झोमी समुदायाने राज्यपालांना विधानसभेचे अधिवेशन पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू होऊन जवळपास चार महिने झाले आहेत. या हिंसाचारात आतापर्यंत १६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो लोक बेघर झाले आहेत. तेथून अनेकजण विस्थापित झाले. मणिपूरमधील कुकी आणि मैतेई समुदायांमधील हिंसाचार संपवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. मणिपूरच्या मुद्द्यावरून नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात बराच गदारोळ झाला.

मणिपूरमध्ये ३ मे पासून हिंसाचार पसरला आहे. आरक्षणावरून मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये सुरू झालेला जातीय हिंसाचार हळूहळू राज्यभर पसरला. मणिपूर हिंसाचारावर जगातील जवळपास सर्वच देशांनी चिंता व्यक्त केली आहे. संसदेतही या मुद्द्यावरून विरोधकांनी मोठी निदर्शने केली होती. केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. त्यानंतर सरकारने विरोधकांचा अविश्वास ठराव हाणून पाडला. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, परंतु हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा