मुंबई, १४ सप्टेंबर २०२३ : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंबंधी याचिकांवर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या याचिकांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. आज दुपारी बारा वाजेपर्यंत आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता. त्यासाठी पुरेशा, योग्य कालावधीत निर्णय घेण्यासही बजावले होते. या निकालाच्या पाच महिन्यांनंतर विधानसभा अध्यक्षांकडे आता प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होत आहे.
दरम्यान, विधिमंडळातील सुनावणीपूर्वी सकाळी ११ वाजता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात ठाकरे गटांच्या आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यानंतर १२ वाजता ठाकरे गटांचे सर्व आमदार आणि वकील सुनावणीसाठी उपस्थित राहतील. अध्यक्षांनी आमदारांना वैयक्तिकरित्या म्हणणे मांडण्याबाबत विचारणा झाल्यावरच आमदार आपली भूमिका वैयक्तिकरित्या मांडतील.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर