राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत

मुंबई, २४ जुलै २०२१: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

कोल्हापूर, सातारा, रायगड आणि रत्नागिरीत अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. तर, अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामुळे विविध दुर्घटनामंध्ये आत्तापर्यंत राज्यात ५० हून अधिक मृत्यू झाले असून मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर अधिक आहे. तसेच पुराच्या पाण्यातअनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा