माजी सैनिकांच्यावतीने पिंगोरी येथील कोरोना योद्धा सैनिकाच्या कुटुंबियांना मदत

पुरंदर १२ ऑक्टोबर २०२० :पुरंदर तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या पिंगोरी येथील मृत सैनिकाच्या कुटुंबाला पुरंदर मधील आजी माजी सैनिक प्रतिष्ठान व किल्ले पुरंदर ग्रुपच्यावतीने एक लक्ष रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या सैनिक संघटनेच्या वतीने यापूर्वी सुद्धा अशा प्रकारची मदत सैनिकांच्या कुटुंबांना करण्यात आली आहे.

पिंगोरी येथील भारतीय नौदलात काम करणाऱ्या गणेश यादव या ३८ वर्षीय तरूण सैनिकाचा कोविडमुळे मृत्यू झाला होता. गणेश यादव हा सुट्टीसाठी गावी आला होता. त्यानंतर आठ दिवसानंतर त्यास त्रास होऊ लागला.त्याच्या मेंदूतील रक्त वाहिनी फुटल्याने त्याला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या दरम्यान त्याची मेंदूची शास्त्र क्रिया करण्यात आली होती.

मात्र कोरोनामुळे त्याच्या उपचारांना कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. समुद्राच्या अथांग पाण्यात शत्रूशी लढणाऱ्या या जवानाला अखेर कोरोना पुढे हार मानवी लागली आणि आपली पत्नी मुलगी आईवडील व भाऊ भावजय असा परिवार सोडून त्याला देवा घरी जावे लागले.

गणेशच्या अशा प्रकारे जाण्याने संपूर्ण पिंगोरी गाव हळहळला.त्याच्या नंतर गणेशच्या कुटुंबातील आठ जण कोरोनी बाधित झाले. मात्र घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या या कुटुंबांनी मोठ्या धैर्याने तोंड देत कोरोनावर मात केली. मात्र या दरम्यान या कुटुंबाला मोठ्या मानसिक व आर्थिक संकटाचा सामना करावा लागला.या संकटातून या कुटुंबाला पुन्हा सावरता यावे म्हणून पुरंदर तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना व किल्ले पुरंदर ग्रुप यांच्या वतीने ‘एकहात मदतीचा’ या उपक्रमातून एक लक्ष चार हजार पाचशे रुपयाचा धनादेश देण्यात आला. गणेशची पत्नी मेघा यादव व आई यांच्याकडे प्रतिष्ठानचे सुभेदार संजय कापरे,हवालदार भरत शिंदे, संदीप मोहिते गणेश शिंदे यांच्या हस्ते यांच्या हस्ते हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

प्रतिष्ठाणने केलेल्या या मदतीबद्दल पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी आभार मानले.पाटील म्हणाले की, कोरोनामुळे आम्ही गणेश सारखा गावातील अत्यंत गुणी मनमिळावू उमदा तरुण सैनिक गमावला आहे.
गणेशच्या जाण्याने त्याच्या कुटुंबाचे व गावाचे मोठे नुकसान झाले आहे. संकटाच्या काळात माजी सैनिकांच्या प्रतिष्ठानने केले सहकार्य व दाखवलेले आपले पण या गावातील लोकांना व सैन्यात असलेल्या तरुणांसाठी प्रेरणादाई आहे.पुढील काळात देश सेवेत सामील होणाऱ्या तरुणांना यामुळे विश्वास व प्रेरणा मिळेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी :-राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा