नवी दिल्ली, ९ ऑक्टोंबर २०२०: केंद्र सरकारनं ६ मे २०२० पासून विविध देशांमध्ये कोरोना काळात अडकलेल्या २० लाख पेक्षा अधिक भारतीय नागरिकांना विविध मार्गांनी मायदेशी परत आणलं आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. वंदे भारत अभियानाअंतर्गत, १७,११,१२८ प्रवासी भारतात परत आले आणि २,९७,५३६ प्रवासी भारताबाहेर गेले, अशी माहिती त्यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय प्रवासाविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितलं की, केंद्र सरकारनं १६ देशांसोबत एअर बबल व्यवस्था केली आहे. जेव्हा सामान्य विमान वाहतूक काही कारणानं बंद केली जाते, त्यावेळी दोन देशांमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी हि एअर बबल व्यवस्था केली जाते. सरकार, इटली, बांगलादेश, कझाकस्तान, युक्रेन आणि इतर काही देशांसोबतही ही व्यवस्था सुरु करण्या विषयी चर्चा करत आहे, अशी महिती त्यांनी दिली.
देशांतर्गत विमानसेवाही २५ मे २०२० पासून टप्प्याटप्यानं सुरु करण्यात आली असुन आता ती ६० टक्कयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. २५ मे पासून आतापर्यंत १.२ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमानप्रवास केला, अशी माहिती त्यांनी दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे