आसू ग्रामस्थांनी बारामती एसटी आगारप्रमुखांना दिले बारामती-आसू बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन

फलटण, १६ फेब्रुवारी २०२३ : फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू परिसरातील विद्यार्थ्यांची, प्रवाशांची सोय व्हावी व बारामती-आसू बससेवा सुरू व्हावी, यासाठी आज बारामती आगाराला आसू ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निरा नदी पट्ट्यातील कडेला असणारी गावे आसू, पवारवाडी, शिंदेनगर, ढवळेवाडी, गोखळी, गवळीनगर, खटके वस्ती, माळी मळा, जाधववाडी, शिंदेवाडी आदी परिसरातील ग्रामस्थांची व विशेष करून शालेय विद्यार्थ्यांची एसटी बसविना खूप मोठी परवड होत आहे. फलटण- इंदापूर तालुक्याला जोडणारा आसू बंधाऱ्यावरून चालत जाताना विद्यार्थ्यांना जीवावर उदार होऊन जावे लागते. ग्रामस्थांच्या वतीने अनेकवेळा बारामती आगाराला निवेदन दिले होते; परंतु त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. १६) आसू ग्रामस्थांच्या वतीने पुणे परिवहन विभागाचे आयुक्त रमाकांत गायकवाड व बारामती डेपोचे आगार व्यवस्थापक मोरे यांना निवेदन दिले.

फलटणपेक्षा बारामती जवळ असल्याने अनेक मुला-मुलींची शिक्षणाची सोय बारामतीला होत असते. त्यामुळे अनेकांनी त्या भागामध्ये शाळा-महाविद्यालयांत प्रवेश घेतले आहेत; परंतु तेथील अधिकाऱ्यांना त्याच्याबाबत देणेघेणे नसल्याने मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच अनेक मुलांना आर्थिक परिस्थितीमुळे चक्क तीन किलोमीटर चालत जावे लागते. त्यातच निरा नदीवर असणाऱ्या बंधार्‍यावर जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. त्यामुळे आसू येथील सुज्ञ ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन आगारप्रमुखांना दिले आहे. तरी एसटी प्रशासनाने निवेदनाची गंभीर दखल घेऊन बारामती- आसू एसटी बस सुरू करावी.

निवेदनावर श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे, ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय घोरपडे आदींची स्वाक्षरी होती.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा