अफगाणिस्तानच्या खोस्त-कुनार प्रांतात पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तान, 17 एप्रिल 2022: पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार मुले आणि एका महिलेचाही समावेश आहे. अफगाणिस्तानातील खोस्त आणि कुनार प्रांतातील स्थानिक अधिकाऱ्यांनी या हल्ल्याला दुजोरा दिलाय. खामा प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार खोस्त प्रांतातील अधिकाऱ्यांनी सांगितलौ की, पाकिस्तानी विमानांनी शुक्रवारी रात्री प्रांतातील पेसा मिला आणि मीर सफार भागात बॉम्बफेक केली. त्याच वेळी, प्रांतातील स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की खोस्ट प्रांतातील स्पेरा जिल्ह्यातही हवाई हल्ले करण्यात आले, ज्यामध्ये दोन कुटुंबातील 33 सदस्य ठार झाले.

कुनार प्रांतातील शाल्टन जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की, पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच मुलं आणि एक महिला ठार झाली. खामा प्रेसने वृत्त दिलंय की पाकिस्तान सरकार किंवा अफगाणिस्तानमधील तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकारने या बॉम्बस्फोटावर कोणतेही विधान केलेलं नाही. मात्र या प्रांतांमध्ये उपस्थित असलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि पश्तून इस्लामी दहशतवादी गटांना लक्ष्य करण्यात आल्याचं पाकिस्तानी मीडियाने म्हटलंय. TTP हा पश्तून इस्लामी दहशतवादी गटांचा समूह आहे. हा दहशतवादी गट पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम आदिवासी भागात उत्तर वझिरीस्तानमध्ये सक्रिय आहे. टीटीपी आणि पाकिस्तानी लष्करामध्ये 2007 पासून संघर्ष सुरू आहे.

पाकिस्तानने बोलावले अफगाणिस्तानच्या प्रभारी राजदूताला

खामा प्रेसच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या निमरोझ प्रांतातील स्थानिक रहिवाशांनी सांगितलं की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अफगाण चालकांवर गोळीबार केला. यामध्ये एका चालकाचा मृत्यू झाला. दुसरीकडं, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी इस्लामाबादमधील प्रभारी अफगाण राजदूताला बोलावून सीमेपलीकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. अफगाण सीमा सुरक्षा दलांकडून चिथावणी देण्यावर गंभीर आक्षेप व्यक्त करताना, परराष्ट्र कार्यालयाने (एफओ) एका निवेदनात म्हटलंय की, सीमेपलीकडील गोळीबाराच्या अशा घटनांचा पाकिस्तान तीव्र निषेध करतो. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा