अमेरिका, ११ ऑगस्ट २०२३ : अमेरिकेच्या हवाई राज्यातील माउइच्या जंगलातील वणव्याने रौद्ररूप धारण केले आहे. या भीषण आगीत आतापर्यंत ५३ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर १ हजार लोक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथे आग धुमसत आहे. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.
या आगीतून बचाव करण्यासाठी १४ हजारांहून अधिक पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तर वीज पुरवठा खंडित झाल्याने ११ हजार लोकांना याचा फटका बसला आहे. माउइच्या जंगलात लागलेल्या आगीत किमान ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. लाहैना या पर्यटन शहराचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स लागतील, असे हवाई येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
हवाईचे गव्हर्नर जोश ग्रीन यांनी येथील वणव्याला हवाई राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असल्याचे म्हटले आहे. बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या लाहैना या शहराचा ८० टक्के भाग उध्वस्त झाला आहे आणि सुमारे १,७०० इमारती नष्ट झाल्या असल्याचे ग्रीन यांनी सांगितले. माउइच्या जंगलात आग मंगळवारी सुरू झाली आणि डोरा चक्रीवादळाच्या वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर