सोमाटणे टोलनाक्यावर दुचाकीचालकांना कसरत करीत चालवावे लागते वाहन

पिंपरी-चिंचवड, १३ डिसेंबर २०२२ : सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर दुचाकी वाहनांसाठी उपलब्ध करून दिलेला रस्ता अतिशय अरुंद असल्याने या मार्गातून जाताना अनेकवेळा अपघात होत आहेत. या टोलनाक्यावर चारचाकी; तसेच अवजड वाहनांसाठी असलेला रस्ता ऐसपैस असून, दुचाकी चालकांसाठी निमुळता रस्ता आहे. दुचाकी मार्गाच्या एका बाजूस धोकादायकरीत्या सिमेंटचे गट्टू उभारलेले आहेत. तर दुसर्‍या बाजूस लोखंडी पट्ट्यांचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. आणखी पुढे गेल्यावर ‘एमएसईबीचे’ खांब मधेच आहेत. वाहनाच्या मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या पायास बर्‍याचदा गट्टू लागल्यामुळे किरकोळ जखमा झाल्याच्या तक्रारी घडल्या आहेत.

धोकादायक अडथळे काढण्याची मागणी
टोल भरणार्‍या वाहनांसाठी मोकळी जागा, तर टोल भरण्याची आवश्यकता नसलेल्या दुचाकी वाहनांसाठी मुद्दाम निमुळता मार्ग ठेवल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांच्या मार्गातील धोकादायक अडथळे तत्काळ काढण्यात यावेत आणि दुचाकी चालकांसाठी मोठा रस्ता करण्याची मागणी दुचाकी वाहनधारक, तसेच नागरिकांनी केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा