तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे १७१ धावांची आघाडी, रोहितचं धडाकेबाज शतक

8
ओव्हल, ५ सप्टेंबर २०२१: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला. यजमानांनी पहिल्या डावाच्या जोरावर भारतावर ९९ धावांची आघाडी घेतली होती. अंधुक प्रकाशामुळे कालच्या दिवसाचा उर्वरित ४० मिनिटांचा खेळ रद्द करण्याचा निर्णय पंचांनी घेतला आहे. तत्पूर्वी भारताने २७० धावांपर्यंत मजल मारल्यामुळे भारताला १७१ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार विराट कोहली (२२) आणि रवींद्र जाडेजा (९) नाबाद आहेत.
सलामीवीर रोहित शर्माची शतकी खेळी आणि त्याला चेतेश्वर पुजाराची लाभलेली साथ इंग्लंडसमोर दमदार आव्हान देण्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरली. रोहितने विदेशातील पहिलेच कसोटी शतक ठोकले, तर पुजाराने अर्धशतकी योगदान दिले. ही कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत आहे. रोहितने काल त्याच्या कसोटी कारकिर्दीतलं १० वं आणि परदेशातलं पहिलं शतक ठोकलं. त्याने १२७ धावांची खेळी केली. तर पुजाराने ६१ धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. ऑली रॉबिन्सनने एकाच षटकात या दोघांनाही बाद करत इंग्लंडला ब्रेकथ्रू मिळवू दिला. मात्र त्यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाने विकेट जाऊ दिली नाही.
तत्पूर्वी दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने ८३ धावांची सलामी दिली. ४६ धावांवर असताना लोकेश राहुल जेम्स अँडरसनची शिकार ठरला. राहुलने ६ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावा केल्या. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराने दिडशतकी भागीदारी करत भारताला आघाडी मिळवून दिली. लंचनंतर रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. नंतर त्याने खेळपट्टीवर स्थिरावलेल्या पुजारासोबत शतकी भागीदारीही रचली. ६४व्या षटकात रोहितने वैयक्तिक ९४ धावांवर असताना षटकार ठोकत शतक साजरे केले. त्याचे हे भारताबाहेर कसोटीतील पहिलेच शतक ठरले.
चहापानानंतर पुजाराने आपले ३१वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. नवा चेंडू घेतल्यानंतर इंग्लंडने ८१व्या षटकात रोहित आणि पुजाराला माघारी धाडले. रॉबिन्सनने या दोघांना झेलबाद केले. रोहितने १४ चौकार आणि एका षटकारासह १२७ तर पुजाराने ९ चौकारांसह ६१ धावा केल्या. या दोघांनंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी तिसऱ्या दिवसअखेर भारतासाठी खिंड लढवली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा