गोल पोस्ट इतर ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

चंद्रपूर, १ जानेवारी २०२३ : ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथे शनिवारी (ता. ३१ डिसेंबर २०२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली. सीताबाई रामाजी सलामे (वय ६०) असे मृत महिलेचे नाव आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव बुज येथील सीताबाई रामाजी सलामे ही महिला नेहमीप्रमाने शेतावर काम करण्यासाठी गेली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घरी परतण्याच्या वेळेवर याच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने सीताबाई यांच्यावर हल्ला चढवला व ठार मारले. बाजूच्या शेतात काम करीत असलेल्या महिलेने आरडाओरड करून सीताबाईंचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केला; पण हे प्रयत्न व्यर्थ ठरले. आरडाओरडा झाल्यानंतर लगेच गावातील नागरिकही धावून आले. या घटनेची माहिती वनविभाग यांना देण्यात आली. काही वेळातच वनविभाग व पोलिस घटनास्थळी दाखल झाले; पण नागरिकांनी मृतदेह उचलू न देण्याचा पवित्रा घेतला.

पोलिस व वनविभाग प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, ब्रह्मपुरी येथे पाठविण्यात आले. तोरगाव बुज येथे वाघाच्या हल्ल्याच्या आतापर्यंत पाच घटना घडलेल्या आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. या परिसरात प्रचंड दहशत असतानाही वाघाचा बंदोबस्त केला जात नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

error: Content is protected !!
Exit mobile version