अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मनरेगामधून साडेतीन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यापैकी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करावेत, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत या पॅकेजवर टीका करत सांगितले की, “हे आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठे पॅकेज नाही, तर सरकारने मारलेली सर्वांत मोठी थाप आहे.” आदित्य ठाकरे, संजय राऊत, ओमराजे निंबाळकर, अरविंद सावंत, अनिल परब आदी नेते यावेळी उपस्थित होते. त्यांनी मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांचे समर्थन केले. उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला की, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रतिहेक्टर मदत मिळावी, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी ही प्रमुख मागणी आहे, आणि जर मदत त्वरित दिली नाही तर आंदोलन करणे भाग पडेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांसाठी मदत न केल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि बिहारमधील महिलांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या उदाहरणाद्वारे देशभर महिलांसाठी समान मदत करण्याची मागणी केली. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीवरही प्रश्न उपस्थित करत, विरोधी पक्ष नेते नसल्यामुळे उपमुख्यमंत्रिपद काढावे आणि त्या नेत्यांना साधे मंत्री म्हणून काम करण्याची सूचना दिली.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील











































