एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न फसला; चोरट्याच्या काही तासातच आवळल्या मुसक्या

सांगली, ४ सप्टेंबर २०२२: सांगलीच्या कुपवाड येथील उल्हासनगर बाजारपेठेतील एका बँकेचे एटीएम मशीन फोडून रोकड लांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला कुपवाड पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली आहे. अनिकेत गणेश व्हनकडे वय १९, राहणार कुपवाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली एक लहान लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे‌. तर आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे कबुली दिली आहे. उल्हासनगर दुय्यम निबंधक कार्यालयाखालील एका गाळ्यामध्ये युनियन बॅकेच्या सांगली शाखेचे एटीएम मशीन आहे. शुक्रवारी रात्री एक ते शनिवारी सकाळी आठ या वेळेमध्ये संशयित आरोपीने लहान लोखंडी पहारीसह एटीएममध्ये प्रवेश केला.

त्याने मशीनवर पहारीने घाव घातले. यामध्ये मशीनच्या आजूबाजूची आणि स्क्रीनची तोडफोड झाली. अथक प्रयत्न करुनही आतमधील रोकड बाहेर नाही आली. अखेर आपले प्रयत्न थांबवून त्यांने तेथून पळ काढला. सकाळी नागरिक बाजारपेठेमध्ये आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याबाबतची माहीती तात्काळ पोलिसांना दिली.

सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी अवघ्या चार तासातच संशयिताचा छडा लावला. हनूमाननगर परिसरातील राहत्या घरातून यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीनंतर त्यांने गुन्ह्याची कबुली दिली. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा