एटीएसने रत्नागिरी येथून दोन संशयित दहशतवाद्यांच्या मदतनीसाला केली अटक

पुणे, ३० जुलै २०२३ : दोन संशयित दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी जिल्ह्यातील एका व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी ताब्यात घेतले होते. शनिवारी एटीएसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार रत्नागिरीतील व्यक्तीला आधीच ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, तपासात त्याचा सहभाग समोर आल्यानंतर त्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही चौथी अटक आहे.

त्या व्यक्तीने पुण्यात कोथरूड पोलिसांनी अटक केलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना आर्थिक मदत केली होती. मात्र, एटीएसने या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. एटीएसने सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेलेल्या एका पथकाने संशयिताला नोटीस बजावली असून त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४) या संशयित दहशतवाद्यांना आश्रय दिल्याप्रकरणी एजन्सीने बुधवारी अब्दुल कादिर दस्तगीर पठाण याला पुण्यात अटक केली.

एटीएसने नुकताच पुणे पोलिसांकडून तपास हाती घेतला आहे. एजन्सीने सांगितले की त्यांनी खान आणि साकी यांच्याकडून “स्फोटक” पावडर, लॅपटॉप, ड्रोनचे काही भाग आणि अरबी भाषेत लिहिलेली पुस्तके आणि इतर गोष्टी जप्त केल्या आहेत. याशिवाय दोघांकडे एक तंबू देखील होता, जो कथितरित्या पुण्याच्या आसपासच्या जिल्ह्यांतील जंगलात राहण्यासाठी विकत घेण्यात आला होता.

राजस्थानमधील दहशतवादाशी संबंधित खटल्यातील कथित सहभागासाठी राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हवा असलेले खान आणि साकी यांना १८ जुलै रोजी पुणे शहरातील कोथरूड परिसरातून अटक करण्यात आली होती. खान, साकी आणि कादिर यांना ५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही संशयित दहशतवादी मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून ते ग्राफिक डिझायनर आहेत. दोघांवर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस असल्याचे पोलिसांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा