पुणे दहशतवादी प्रकरणात ATS ची मोठी कारवाई, ठाण्यातून पाचव्या आरोपीला अटक

ठाणे, २ ऑगस्ट २०२३ : पुण्यातील संशयित दहशतवादी प्रकरणातील आणखी एका आरोपीला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. झुल्फिकार अली बडोदावाला (रा. पडघा, ठाणे) असे अटक केलेल्या पाचव्या आरोपीचे नाव आहे. तो राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत होता. न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यातील संशयित दहशतवादी प्रकरणाशी त्याचा संबंध समोर आल्यानंतर एटीएसने त्याला मुंबई मध्यवर्ती कारागृहात नेले आहे. या प्रकरणातील भूमिकेसाठी एटीएस त्याची कसुन तपासणी करत आहे. या आधी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) आणि आर्थिक रसद पुरविणाऱ्या सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७, रा. कोंढवा) या दोघांना अटक झाली होती. त्यानंतर आता झुल्फिकार बडोदावाला याला अटक झाली आहे.

यापूर्वी पुण्यातील विशेष न्यायालयाने याआधी अटक केलेल्या आरोपींना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावली होती. मात्र, याप्रकरणी आतापर्यंत एटीएसने पाच आरोपींना अटक केली आहे. मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान (२३) आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी (२४) यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA ) १८ जुलै रोजी पुण्यातील कोथरूड येथून अटक करण्यात आली होती. दोघेही राजस्थानमधील कथित दहशतवादी कारवायांमध्ये वॉन्टेड होते. या प्रकरणाचा तपास नंतर पुणे पोलिसांकडून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा